आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण; लवकरच बाजारात येणार भारतात तयार झालेले स्वस्त iPhones
यामुळे आयफोनची किंमत मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि अशा प्रकारे अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
अॅपलचे आयफोन (Apple iPhones) खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु हे फोन महाग असल्याने काही लोक ते खरेदी शकत नाहीत, अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे. आता भारताच्या बाजारपेठेत जे आयफोन येतील ते चीन मध्ये बनवलेले नसतील तर ते असतील भारतच बनवलेले. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट मध्ये फॉक्सकॉनचे भारतस्थित युनिट इथेच एकत्रित केलेल्या आयफोन विक्री करण्यास प्रारंभ करेल. यामुळे आयफोनची किंमत मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि अशा प्रकारे अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
याबाबत न्यूज एजन्सी रॉयटर्सने सांगितले आहे की, या गोष्टीसाठी अजून काही गोष्टींची मंजुरी मिळाली नाही, मात्र भारतात बनवलेले आयफोन एक्सआर (iPhoneXR) आणि एक्सएस (iPhoneXS) पुढील महिन्यात बाजारात उपलब्ध होतील. कंपनीकडून अजूनतरी याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. हे आयफोन भारतात एकत्रित झाल्यामुळे कंपनीवरील कराचा बोझा कमी होणार आहे. या गोष्टीची परिणती कंपनी भारतामध्ये आपले पहिले रिटेल स्टोअर खोलण्यात होऊ शकेल. (हेही वाचा: नवीन आयफोन मध्ये असू शकतात हे आकर्षक फिचर्स)
आयटी कंपनी अॅपलने भारतात तयार झालेले आयफोन युरोपियन बाजारात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. 2016 मध्ये कंपनीने भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले, ज्यामध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाली. आधी कंपनी चीनमध्ये आपले उत्पादन बनवत होती, मात्र आता भारताच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत हे उत्पादन भारतात सुरु झाले. फॉक्सकॉन आयफोनच्या एक्स व्हर्जनला तामिळनाडू येथील कारखान्यात तयार केले जाते. तर आयफोनची काही स्वस्त मॉडेल्स, SE, 6 एस आणि 7 एस चे एकत्रीकरण बंगलोरमध्ये होत आहे.