iPhone Export From India: अॅपलने रचला इतिहास; अवघ्या एका महिन्यात भारतामधून निर्यात केले तब्बल 8,100 कोटींचे आयफोन
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएलआय योजनांमध्ये आयफोन आघाडीवर आहे, आता ज्याची निर्यात दर महिन्याला $1 अब्जपर्यंत पोहोचली आहे.
सध्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात भारत एक प्रमुख पर्याय म्हणून उदयास येत आहे आणि चीनला तगडी स्पर्धा देत आहे. गेल्या एका महिन्यात अॅपल आयफोनच्या (Apple iPhone) मोठ्या प्रमाणावरील निर्यातीने याचे संकेत दिले आहेत. गेल्या एका महिन्यात देशातून अॅपल आयफोनच्या निर्यातीत मोठी झेप घेतली आहे. एका महिन्यात भारतातून एक अब्ज डॉलर (8,100 कोटी रुपये) किमतीचे स्मार्टफोन निर्यात करणारी अॅपल ही पहिली कंपनी आहे. आयफोन निर्मात्याने डिसेंबर 2022 मध्ये हा विक्रम केला आहे.
आकडेवारीनुसार, भारतातील स्मार्टफोन उद्योगाने डिसेंबर महिन्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मोबाईल फोनची निर्यात केली. अॅपल आणि सॅमसंग या भारतातून मोबाईल फोन निर्यात करणाऱ्या प्रमुख कंपन्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरमध्ये अॅपलने सॅमसंगला मागे टाकले होते. यानंतर, अॅपलने डिसेंबरमध्ये एक अब्ज डॉलर्सचे मोबाइल फोन निर्यात केले. अशा परिस्थितीत ही आकडेवारी 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाला मोठी चालना देण्याचे काम करत आहे.
अॅपल भारतात आयफोन 12, 13, 14 आणि 14+ मॉडेल्सचे उत्पादन आणि निर्यात करत आहे. या तीन उत्पादकांव्यतिरिक्त, काही लहान भारतीय निर्यातदारांनी असेही म्हटले आहे की ते भारतातून आयफोन निर्यात करत आहेत. भारतात तीन प्रमुख आयफोन उत्पादक आहेत. हे Foxconn Hon Hai, Pegatron आणि Wistron आहेत. देशात,या उत्पादक कंपन्या तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये आयफोनची निर्मिती करत आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन (PLI) योजना सुरू केली आहे.
केंद्रातील मोदी सरकारला पीएलआय योजनेद्वारे, भारत हे स्मार्टफोन, टीव्ही, फ्रीज इत्यादीसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी जगातील सर्वात मोठे केंद्र बनवायचे आहे. या योजनेंतर्गत, सरकार देशातील उत्पादनाला गती देण्यासाठी अनेक फायदे देते. त्या बदल्यात कंपनीला आपले उत्पादन, निर्यात, गुंतवणूक आणि नोकरीची माहिती सरकारला द्यावी लागते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात 5.8 अब्ज डॉलर होती, जी आता 2022-23 या आर्थिक वर्षात 9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Twitter Blue: ट्विटर युजर्सना धक्का; ब्लू टिकच्या किमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर)
पीएलआय योजना 13 क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएलआय योजनांमध्ये आयफोन आघाडीवर आहे, आता ज्याची निर्यात दर महिन्याला $1 अब्जपर्यंत पोहोचली आहे.