India's Most Valuable Brand: एचडीएफसीला मागे टाकून TCS बनला भारतामधील सर्वात व्हॅल्युएबल ब्रँड; 45,519 मिलियन डॉलरवर पोहोचले मूल्य
या यादीत दिग्गज आयटी कंपनीच्या क्रमवारीत दोन स्थानांची वाढ झाली असून, ती पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. यापूर्वी एचडीएफसी बँक या क्रमवारीत अव्वल स्थानावर होती.
भारतातील शीर्ष आयटी सेवा प्रदाता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हा 2022 मध्ये देशातील सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड ठरला (Most Valuable Brand in India) आहे. Kantar BrandZ इंडिया रँकिंगमधून ही माहिती मिळाली आहे. Kantar या जगातील सर्वात मोठ्या मार्केटिंग डेटा आणि विश्लेषण कंपनीने बुधवारी कंतार ब्रँड्स टॉप 75 मोस्ट व्हॅल्युएबल इंडिया ब्रँड्स 2022 अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये, TCS ची ब्रँड व्हॅल्यू $ 45,519 दशलक्ष ठेवण्यात आली आहे. अशाप्रकारे ही सॉफ्टवेअर कंपनी अव्वल स्थानावर आहे.
2020 च्या तुलनेत 2022 मध्ये TCS च्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 212 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या यादीत दिग्गज आयटी कंपनीच्या क्रमवारीत दोन स्थानांची वाढ झाली असून, ती पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. यापूर्वी एचडीएफसी बँक या क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. कंतार ब्रँड्स इंडिया रँकिंग 2014 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि तेव्हापासून एचडीएफसी बँक क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. आता एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
कंतार जगातील सर्वोत्तम ब्रँड्सची रँकिंग करते. TCS हा 2022 च्या कंतार ब्रँड्सच्या क्रमवारीत अव्वल भारतीय ब्रँड म्हणून उदयास आला आहे. आशिया पॅसिफिक स्तरावर TCS दुसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र सॅमसंगच्या पुढे आहे. अहवालात टीसीएसची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. त्यापाठोपाठ बिझनेस सोल्युशन्स आणि टेक्नॉलॉजी पार्टनर्सचा क्रमांक लागतो, ज्यांचे टॉप 75 मध्ये सहा ब्रँड आहेत. हे रँकिंगच्या एकूण मूल्याच्या 24 टक्के आहेत. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत या ब्रँड्सचा मोठा वाटा आहे. याद्वारे जागतिक ग्राहकांसोबत देशांतर्गत गरजाही पूर्ण केल्या जातात. (हेही वाचा: No Moonlighting: 'डबल नोकरी' करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इन्फोसिस कंपनीचा इशारा, 'नो मूनलाइटिंग')
यापूर्वी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जानेवारीमध्ये नवा विक्रम केला होता. टाटा कन्सल्टन्सी ही जगभरातील आयटी सेवा क्षेत्रातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून उदयास आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या ब्रँड फायनान्सच्या अहवालात हे सांगण्यात आले आहे. टाटा कन्सल्टन्सी व्यतिरिक्त, इतर भारतीय दिग्गज जसे की, इन्फोसिस आणि चार टेक कंपन्यांनी शीर्ष 25 आयटी सेवा ब्रँडमध्ये स्थान मिळवले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही टाटा समूहातील सर्वात महत्त्वाची कंपनी आहे, जी आयटी सेवांशी संबंधित आहे.