तुम्ही वापरत असलेले चार्जर बनावट तर नाही ना? हे वाचा आणि खात्री करून घ्या

सध्याच्या सर्वेनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळणाऱ्या स्मार्टफोन चार्जरपैकी बरेचसे चार्जर हे नकली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चार्जर अथवा फोन वारंवार गरम होणे. ब्लास्ट होणे, फोन लवकर चार्ज न होणे किंवा फोन खराब होणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याकडे असलेला अथवा आपण नवीन घेणार असलेला चार्जर हा डुप्लिकेट आहे की नाही हे ओळखणे फारच कठीण काम आहे. म्हणूनच आम्ही सांगणार आहोत काही टिप्स त्यामुळे एखादा चार्जर हा असली आहे का नकली हे ओळखणे आपल्यासाठी शक्य होईल.

सॅमसंग

सॅमसंगच्या ओरिजनल आणि डुप्लिकेट चार्जरमधील फरक हा अतिशय बारीक असतो. चार्जरच्या प्रिंटेड मॅटरमध्ये 'A+' आणि 'मेड इन चाइना' लिहिले असेल तर ते चार्जर डुप्लिकेट आहे हे समजावे. याचसोबत ओरिजनल चार्जरच्या पिनचा बेस(पांढरा भाग) खाली जाड आणि वर बारीक असतो. डुप्लिकेट चार्जरमध्ये हाच भाग एकसमान असतो.

आयफोन चार्जर

सॅमसंगप्रमाणेच आयफोनचा असली अथवा नकली चार्जर ओळखणे सोपे नाहीये. ओरिजनल चार्जरच्या अडॅप्टरवर प्रिंटेड मॅटर सेमी ट्रान्सपरंट असतं, तर डुप्लिकेट चार्जरवर हे मॅटर डार्क काळ्या शाईने प्रिंट केलेलं असतं. तसेच ज्या चार्जरवर ‘डिझाइन बाय कॅलिफोर्निया’ असे लिहिलेलं असते तो चार्जर ओरिजनल आहे असे समजावे.

एमआय

चायनीज कंपनी एमआयचे देखील डुप्लिकेट चार्जर मार्केटमध्ये विकले जातात. चार्जरची केबल जर १२० सेंटीमीटरपेक्षा कमी असेल, अॅडॅप्टरचे कोपरे जर का शार्प नसतील आणि याचा आकारही सामान्य चार्जरपेक्षा मोठा असेल तर ते डुप्लिकेट चार्जर आहे हे समजावे.

वन प्लस

वन प्लस आपल्या डॅश चार्जरसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे काही मिनिटांमध्येच मोबाईल फुल चार्ज होतो. मात्र मोबाईल मॉडेलनुसार त्यांचे अॅडॅप्टर हे वेगवेगळे असू शकतात. वन प्लसचं ओरिजनल चार्जर ओळखायची पद्धत म्हणजे जेव्हा तुम्ही प्लग ऑन कराल तेव्हा स्क्रीनवर डॅश चार्जिंग लिहीलेलं दिसेल, तेच जर चार्जर डुप्लिकेट असेल तर केवळ चार्जिंग लिहिलेलं दिसेल.

हुवेई

हुवेईचं चार्जर ओळखायचं असेल तर अडॅप्टरवर असलेला बारकोड स्कॅन करा. बारकोडवर जी माहिती आहे ती बारकोडसोबत मिळती-जुळती नसेल तर तो चार्जर डुप्लिकेट आहे असे समजावे.

गुगल पिक्सल

इतर फोन्सप्रमाणे गुगलनेही आपल्या पिक्सल स्मार्टफोनमध्ये लवकर चार्ज होण्याची सुविधा दिली आहे. पण जर का चार्जर डुप्लिकेट असेल, तर फोन लवकर चार्ज होणार नाही. चार्जरच्या पिनवरुनदेखील तुम्ही डुप्लिकेट आणि ओरिजनल चार्जरची ओळख पटवू शकता. डुप्लिकेट चार्जरची पिन लांब असते तर ओऱिजनल चार्जरची छोटी.