...असे पडले 'गुगल' हे नाव !

टायटॅनिक जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटोज सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले.

फाईल फोटो

सध्या गुगलचा जमाना आहे. कुठेही अडखळलात, तर गुगल मदतीला धावून येतो. जगाच्या पाठीवरील कोणतीही माहिती गुगच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहज शोधू शकता. म्हणून गुगलला गुरु, गुगलबाबा अशी मजेशीर नावेही पडली आहेत. एकंदर काय तर गुगलने आपले आयुष्य सोपे केले आहे. आजकालच्या लहान मुलांनाही गुगलचे महत्त्व अचूक माहित आहे.

गुगलप्रमाणे अनेक सर्च इंजिन्स आले, पण त्यांचा फार काही टिकाव लागला नाही. त्यामुळे स्वाभाविकच गुगलचा भाव वधारला आणि हे सर्च इंजिन प्रसिद्ध झाले. पण या सर्च इंजिनचे पूर्वीचे नाव तुम्हाला कोणी विचारले तर अनेकांना या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही.

काय होते गुगलचे पूर्वीचे नाव?

१९९८ मध्ये गुगलची स्थापना झाली. गुगलचे पूर्वीचे नाव होते बॅकरब. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापिठात शिकणाऱ्या लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी गुगलची निर्मिती केली. टायटॅनिक जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटोज सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले. शोधण्यात आलेली वेबसाईट किती महत्त्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी ते बॅक लिंक्स पद्धतीबरोबरच त्या साईटशी संबंधित इतर साईट्सचा वापर करत असत. त्यामुळेच याचे नाव बॅकरब ठेवण्यात आले.

गुगल नाव कसे पडले?

१९९७ मध्ये बॅकरब हे नाव तितकेसे कॅची किंवा चांगले नसल्याचे लक्षात आले. मग हे नाव बदलण्यावर चर्चा आणि विचार होऊ लागले. मग गणितातील एका संकल्पनेवरुन गुगल हे नाव ठेवण्यात आले. गुगल म्हणजे एकावर १०० शून्य. याचा अर्थ एक गोष्ट शोधल्यावर १०० गोष्टी सापडतील. मग हे साजेसे नाव गुगल जगापुढे आले. जगभरात असलेली माहिती योग्य पद्धतीने साठवणे हा कंपनीचा सुरुवातीला मुख्य उद्देश होता. त्यानंतर कंपनीने आपल्या वेगवेगळ्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली.