लवकरच गुगल बंद करणार हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप

त्यापूर्वी वापरकर्त्यांनी त्यांचे चॅट्स डाऊनलोड करून घ्यावेत अशी घोषणा कंपनीने केली आहे.

गुगल (Photo credits: Unsplash.com)

व्हॉट्सअॅपने परत एकदा बाजारातील आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. अगदी कमी कालावधीमध्ये तमाम मोबाईल धारकांमध्ये व्हॉट्सअॅपची लोकप्रियता अतिशय वाढली होती. म्हणूनच व्हॉट्सअॅपची बाजारात एंट्री झाल्याबरोबर कित्येक मेसेजिंग अॅप्सनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे बाजारातील मेसेजिंग अॅप्सची स्पर्धादेखील कमी झाली होती. आता गुगलने आपले लोकप्रिय मेसेजिंग अॅप Allo बंद करण्याची घोषणा केली आहे. गुगलने एप्रिलपासूनच या प्रोजेक्टवर पैसा लावणे बंद केले आहे. त्यामुळे हे अॅप आता लवकरच बंद होईल.

सप्टेंबर 2016 मध्ये गुगलने हे अॅप बाजारात आणले होते. सुरुवातीला या अॅपचा बोलबालादेखील होता मात्र व्हॉट्सअॅपसमोर हे अॅप लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात पूर्णतः अयशस्वी ठरले. आश्चर्य म्हणजे स्मार्टफोनमधील सर्वात मोठी अँड्रॉइड सिस्टीमची मालकी असलेल्या गुगलला कधीच मेसेजिंग अॅपचे मार्केट काबीज करता आले नाही. मध्यंतरी काही नवीन फिचर्स कंपनीने या अॅपसाठी आणले होते, मात्र तरीही व्हॉट्सअॅपशी टक्कर देण्याऐवढी लोकप्रियता या अॅपला कधीही मिळाली नाही. या अॅपमध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधा नव्हती, याशिवाय फाइल शेअरिंग फिचरही देण्यात आले नव्हते. म्हणूनच युजर्स व्हॉट्सअॅपला प्रध्यान डेट होते.

मार्च 2019 मध्ये हे अॅप बंद होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी वापरकर्त्यांनी त्यांचे चॅट्स डाऊनलोड करून घ्यावेत अशी घोषणा कंपनीने केली आहे.