Flipkart Wholesale ने किराणा, MSMEs साठी सुरु केले डिजिटल प्लॅटफॉर्म; जाणून घ्या काय असतील फायदे
या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनीचे उद्दिष्ट स्थानिक उत्पादकांना किरकोळ विक्रेत्यांशी जोडणे
भारतातील होमग्रोन फ्लिपकार्ट ग्रुप (Flipkart Group) च्या डिजिटल बी 2 बी मार्केटप्लेस फ्लिपकार्ट होलसेल (Flipkart Wholesale) ने, डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनीचे उद्दिष्ट स्थानिक उत्पादकांना किरकोळ विक्रेत्यांशी जोडणे आणि संपूर्ण घाऊक बाजार तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या अधिपत्याखाली आणणे हे आहे. म्हणजेच देशातील लघु व मध्यम उद्योग (MSMEs) आणि स्थानिक उत्पादकांना किराणाच्या रिटेल दुकानदारांसोबत जोडले जाईल. गेल्या महिन्यात, फ्लिपकार्ट समूहाने भारताच्या 650 अब्ज डॉलर्सच्या घाऊक बाजारात प्रवेश करण्यासाठी, नवीन डिजिटल बाजार ‘फ्लिपकार्ट होलसेल’ सुरु करण्याची घोषणा केली होती.
हा प्लॅटफॉर्म सध्या गुरुग्राम, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये फॅशन बाबतच्या किरकोळ विक्रेत्यांसाठी विशेषत: पादत्राणे आणि कपड्यांसाठी उपलब्ध आहे. कंपनीची मुंबईतही विस्तारण्याची योजना आहे. गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरील अॅपद्वारे बी2बी डिजिटल प्लॅटफॉर्म किरकोळ विक्रेत्यांसाठी सोयीस्करपणे उपलब्ध आहे. 300 हून अधिक भागीदारांना जोडणे 2 महिन्यांमध्ये 2 लाखाहून अधिक लिस्टिंग करणे हे कंपनीचे लक्ष्य आहे. याव्यतिरिक्त, येत्या काही दिवसात, कंपनी त्यांच्या व्यासपीठावर 50 ब्रांड आणि 250 हून अधिक स्थानिक उत्पादकांना ऑनबोर्ड करेल.
फ्लिपकार्ट होलसेलचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख आदर्श मेनन म्हणाले, 'फ्लिपकार्ट होलसेलचा वापर भारतीय किराणा आणि एमएसएमई तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा व्यवसाय सुलभ करण्यासाठीचा प्रस्ताव आहे. बी 2 बी मधील गटामध्ये प्रबल क्षमतेसह आम्ही या छोट्या व्यवसायांचे जीवन सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञान-संचालित किराणा आणि एमएसएमईच्या गरजा भागविण्यावर भर देऊ.' किराणाच्या किरकोळ दुकानदारांना व्यवसाय करण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून, Flipkart Wholesale आपल्या ग्राहकांना क्रेडिट सुविधाही देणार आहे. (हेही वाचा: Digital Gold: सोने खरेदीसाठी Amazon ने सुरु केली नवी योजना; आता अॅमेझॉन पे वरून अवघ्या 5 रुपयांमध्ये खरेदी करू शकता डिजिटल गोल्ड)
कंपनीचे म्हणणे आहे की, डिजिटल प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाचा वापर करून, किरकोळ व्यापारी आणि स्थानिक उत्पादकांना घाऊक बाजार उपलब्ध होईल, जेथे किराणा दुकानदार स्वस्त किंमतीत उत्पादनांची खरेदी करू शकतील आणि चांगला नफा मिळवू शकतील.