Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामात ऑपरेशनल क्षमता मजबूत करणे आणि आर्थिक विकासाला गती देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासही मदत होईल.
Flipkart To Create Jobs: लवकरच फ्लिपकार्टवर (Flipkart) वर्षातील सर्वात मोठा सेल सुरु होणार आहे, जो 'बिग बिलियन डेज 2024' (Big Billion Days Sale 2024) म्हणून ओळखला जातो. आगामी सणासुदीच्या हंगामासाठी दरवर्षी फ्लिपकार्ट हा सेल घेऊन येते. आता या नव्या सेलसाठी कंपनी तयारी करत आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, ते सेलपूर्वी 1 लाखाहून अधिक नवीन रोजगार निर्माण करतील आणि देशभरात 11 नवीन पूर्तता केंद्रे म्हणजेच गोदामे उघडली जातील. या नोकऱ्या गोदामे, दुकाने आणि वितरणात असतील. फ्लिपकार्टने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, आगामी सणासुदीच्या सेलपूर्वी, त्यांनी नऊ शहरांमध्ये 11 नवीन पूर्ती केंद्रे सुरू केली आहेत, ज्यामुळे देशातील या केंद्रांची संख्या 83 झाली आहे.
वॉलमार्ट ग्रुप कंपनीने पुढे सांगितले की, फ्लिपकार्ट देशभरात तिच्या पुरवठा साखळीत एक लाखाहून अधिक नवीन रोजगार निर्माण करणार आहे. या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामात ऑपरेशनल क्षमता मजबूत करणे आणि आर्थिक विकासाला गती देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासही मदत होईल.
फ्लिपकार्टने म्हटले आहे की, पुरवठा साखळीच्या या विविध क्षेत्रात नवीन नोकऱ्या निर्माण केल्या जातील. यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजर, वेअरहाऊस असोसिएट, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर, किराणा भागीदार आणि डिलिव्हरी ड्रायव्हर्स यांचा समावेश आहे. सणांदरम्यान ई-कॉमर्स कंपन्यांनी आयोजित केलेल्या सेलदरम्यान निर्माण होणाऱ्या नोकऱ्या अनेकदा हंगामी स्वरूपाच्या असतात. फ्लिपकार्टने सांगितले की, ते सणासुदीच्या आधी नवीन कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य आणि प्रशिक्षण कार्यक्रमदेखील आयोजित करणार आहेत. (हेही वाचा: Flipkart Big Billion Days Sale 2024: ग्राहकांसाठी खुशखबर! समोर आली यंदाच्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची तारीख; विविध उत्पादनांवर मोठी सवलत आणि सूट मिळण्याची अपेक्षा)
आगामी सणासुदीचा काळ हा ई-कॉमर्स कंपन्यांसाठी सर्वात व्यस्त काळ आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी फ्लिपकार्ट तयारी करत आहे. फ्लिपकार्टला ऍमेझॉनसारख्या मोठ्या ब्रँड्स तसेच झेप्टो, ब्लिंकिट आणि इन्स्टामार्ट सारख्या नवीन खेळाडूंकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. फ्लिपकार्टने अलीकडेच त्यांची इन्स्टंट डिलिव्हरी सेवा फ्लिपकार्ट मिनिट्स देखील सुरू केली आहे. ही सेवा यशस्वी करण्यासाठी कंपनीला मजबूत पुरवठा साखळी आवश्यक आहे.