Fear About Technology: 'तंत्रज्ञानामुळे जाऊ शकतात आपल्या नोकऱ्या', चार पैकी तीन भारतीयांना भीती; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतीय तंत्रज्ञांसाठी त्यांच्या कौशल्य विकासाचा मुख्य उद्देश स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे, नोकरीबद्दल अधिक सुरक्षित राहणे आणि आपला कौशल्य संच वाढवणे हे आहे.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

भारतातील तंत्रज्ञानाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. ज्या प्रकारे जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची (Artificial Intelligence) चर्चा वाढत आहे, त्याच पद्धतीने लोकांमध्ये नव्या तंत्रज्ञानाबद्दलच्या चिंताही वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत व आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अशीच भीती निर्माण झाली आहे. चार पैकी तीन भारतीयांना वाटते की, जर त्यांनी त्यांचे कौशल्य विकसित केले नाही तर तंत्रज्ञान त्यांच्या नोकऱ्या काढून घेईल.

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून हे दिसून आले आहे. व्यावसायिक वित्त आणि विमा, सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा, आरोग्य सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आपली नोकरी जाण्याची सर्वात जास्त भीती आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम आणि सेवा प्लॅटफॉर्म एमेरिटसद्वारे जारी, एमेरिटस ग्लोबल वर्कप्लेस स्किल्स स्टडी 2023 नुसार, आपली नोकत्री जाऊ नये म्हणून व्यावसायिकांमध्ये डिजिटल मार्केटिंग, डेटा अॅनालिटिक्स, फायनान्स, मॅनेजमेंट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या विषयांना सर्वाधिक मागणी आहे.

हा अहवाल भारतातील 20 मोठ्या आणि मध्यम शहरांमधील 1,720 व्यावसायिकांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. यामध्ये 25 ते 65 वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश होता. अभ्यासानुसार, अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारायची आहेत. जवळजवळ 94 टक्के सॉफ्टवेअर आणि आयटी व्यावसायिकांना तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची कौशल्ये विकसित करायची आहेत, तर 93 टक्के तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करणाऱ्यांनीही आपली तांत्रिक कौशल्ये सुधारण्यात स्वारस्य दाखवले आहे. उत्पादन क्षेत्रातील 86 टक्के व्यावसायिकांणा आपली कौशल्य विकसित करून तंत्रज्ञानाचा फायदा कसा घेता येईल, हे जाणून घ्यायचे आहे. (हेही वाचा: Dell Layoffs: डेलमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, सेल्स टीममधील लोकांना मिळणार नारळ)

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतीय तंत्रज्ञांसाठी त्यांच्या कौशल्य विकासाचा मुख्य उद्देश स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे, नोकरीबद्दल अधिक सुरक्षित राहणे आणि आपला कौशल्य संच वाढवणे हे आहे. दरम्यान, विविध उद्योगांशी संबंधित प्रत्येक तीन भारतीयांपैकी एकाला त्यांच्या संस्थेतील नवीन तंत्रज्ञानाच्या संधी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यास स्वारस्य होते. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 80 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, जर नोकरी करत करत त्यांनी त्यांचे शिक्षण चालू ठेवले तर ते नियोक्त्याशी अधिक प्रामाणिक राहतील.