थायलंड आणि कॅनडामध्ये फेसबुकचे नवे डेटिंग अॅप सुरु
या पार्श्वभूमीवर थायलंड आणि कॅनडामध्ये ‘फेसबुक डेटिंग’अॅपची चाचणी घेण्यात आली आहे
आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी फेसबुक नेहमीच नवनवीन फंडे वापरताना दिसत आहे. दिवसेंदिवस अपडेट होणारे फेसबुकचे व्हर्जन, नवीन व्हिडीओ कॉलची सुविधा यानंतर आता फेसबुक डेटिंग अॅप क्षेत्रातही शिरकाव करीत आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकने टिंंडर आणि बंबलच्या धर्तीवर एक नवीन डेटिंग अॅप सुरु करत असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर थायलंड आणि कॅनडामध्ये ‘फेसबुक डेटिंग’अॅपची चाचणी घेण्यात आली आहे.
फेसबुकने डेटिंगची सेवा प्रथम कोलंबियात सप्टेंबरमध्ये सुरू केली. विविध ग्रुपमध्ये संवाद आणि इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचे पर्यायदेखील यामध्ये देण्यात आले होते. त्यातून लोकांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी प्रोत्साहन मिळते असे फेसबुकचे म्हणणे होते. इथे या अॅपला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आता फेसबुकने यामध्ये काही नवीन सुविधा समाविष्ट करून हे अॅप कॅनडा आणि थायलंडमध्येही सुरु केले. यामधील सर्वात आकर्षित फिचर म्हणजे 'सेकंड लूक'. या देशांमधील लोकांनादेखील हे नवे अॅप आवडले असून लवकरच ते आपल्या भारतातही उपलब्ध होईल यात काही शंका नाही.