फेसबुकचे नवे डेटिंग अॅप बाजारात; मित्रांसोबतच शोधा आता जीवनाचा जोडीदार
ज्याद्वारे तुम्ही शोधू शकता तुम्हाचा 'सोलमेट'.
फेसबुकमुळे जग जवळ आले असे म्हणतात. नवे मित्र-मैत्रिणी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे फेसबुक आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. मात्र आता आप्तस्वकीयांसोबत ‘टच’ मध्ये राहण्याव्यतिरिक्त फेसबुक तुम्हाला मदत करणार आहे तुमचा जोडीदार शोधण्यासाठी. होय आता फेसबुक घेऊन येत आहे स्वतःचे डेटिंग अॅप. ज्याद्वारे तुम्ही शोधू शकता तुम्हाचा 'सोलमेट'.
भारतामध्येतरी डेटिंग अॅप्सवर मक्तेदारी आहे ती टिंडरची, टिंडरसोबतच इतर अनेक अॅप्स डेटिंगसाठी वापरले जातात. बाजारात LGBTQ लोकांसाठीही वेगळे अॅप्स उपलब्ध आहेत. अशा सर्व डेटिंग अॅप्सना टक्कर देण्यासाठी फेसबुकसुद्धा आता मार्केटमध्ये उतरत आहे.
सध्या फेसबुक डेटींग अॅपची टेस्टिंग कोलंबिया इथे सुरु आहे. नुकतेच फेसबुकने त्याचे डेटिंग अॅप कोलंबियामध्ये रोल आउटदेखील केले. लवकरच इतर देशांमध्येही या अॅपची घोषणा होईल. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती या सेवेचा फायदा घेऊ शकणार आहे. पण या सेवेचा फायदा डेस्कटॉप यूजर्सना होणार नाही. सध्या ही सेवा मोफत असून ती फेसबुकसोबतच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फेसबुकचे प्रॉडक्ट मॅनेजप नाथन शार्प म्हणाले की, 'डेटींग एक अशी गोष्ट आहे जी अनेक वर्षांपासून आपण फेसबुकवर होताना पाहिली आहे. आता आम्ही केवळ याला सोपे केले आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोक याचा भाग होऊ शकतील.’
डेटींग प्रोफाईल
डेटींगचं हे फीचर पूर्णपणे पर्यायी आहे. प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी फेसबुक व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाईलचा वापर केवळ व्यक्तीचं नाव आणि वय जाणून घेण्यासाठीच करतील. तुमच्याशी संबंधीत कोणत्याही व्यक्तीला तुम्ही डेटींग करत आहात हे कळणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. आपल्या जवळच्या 100किमी पर्यंतच्या व्यक्तीची प्रोफाईल तुम्हाला दिसू शकते.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक वेगळं डेटींग प्रोफाईल तयार करावे लागेल. त्यात तुम्हाला तुमच्याबाबत माहिती द्यावी लागेल. एक प्रोफाईल फोटो, खाजगी माहिती, वय सोबतच तुम्हाला 20 प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागतील. उत्तरांमधील कॉमन गोष्टी पाहून हे अॅप तुम्हाला प्रोफाईल्स सजेस्ट करेल. ही प्रोफाईल फेसबुक प्रोफाईलपेक्षा संपूर्णतः वेगळी असेल.
वेगळेपण -
फेसबुकचं हे अॅप टिंडर आणि बम्बलपेक्षा फार वेगळं आहे. टिंडरवर आधी राईट स्वाईप करून त्यांनतर तुम्ही समोरील व्यक्तीशी बोलू शकता, मात्र या फेसबुक अॅपवर तुमच्या पसंतीच्या सर्व प्रोफाईल्स तुम्हाला दाखवण्यात येतील. तुम्हाला हवे तसे स्क्रॉल करून तुम्ही हव्या त्या व्यक्तीशी बोलू शकता.
यात एकच त्रूटी आहे, ती म्हणजे तुम्ही आधीपासूनच ज्या लोकांशी फेसबुकवर मित्र आहात, अशा लोकांशी तुम्हाला या अॅपवर बोलता येणार नाही.