Elon Musk on Artificial Intelligence: उद्ध्वस्त होईल समाज; जगातील 1000 तज्ञांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास थांबवण्याचे आवाहन, Elon Musk यांनी दिला इशारा
कंपनीने दावा केला आहे की, त्यांचे नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलपेक्षा खूपच शक्तिशाली आहे.
आजकाल जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्राची व्याप्ती वेगाने वाढत आहे. दररोज या क्षेत्रात नवनवीन विकास पाहायला मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसत आहे. मात्र, त्याचे काही धोकेही समोर येत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अनेक नोकऱ्यांवर गदा आणली आहे. काही लोक याला 'मानवांसाठी धोका' मानत आहेत. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलोन मस्कसह अनेक दिग्गजांना हा धोका जाणवला आहे. या सर्वांनी एक पत्र लिहून एआयशी संबंधित नवीन प्रकल्पांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
मस्क यांनी याआधीही एआयबद्दल अनेकदा इशारा दिला आहे. त्यांचा असा विश्वास आहे की काही काळानंतर एआय मानवांवर वर्चस्व गाजवू शकते. सॅन फ्रान्सिस्को स्टार्टअप OpenAI च्या GPT-4 च्या अलीकडील रिलीझबाबत एका खुल्या पत्रावर आतापर्यंत, एलॉन मस्क आणि Apple सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांच्यासह 1,000 हून अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत.
बाजारात असलेले GPT-4 ही मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या AI चॅटबॉट ChatGPT ची अधिक प्रगत आवृत्ती आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांचे नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलपेक्षा खूपच शक्तिशाली आहे. आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या दिग्गज कंपन्याही अशाच प्रकारचे सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या शर्यतीत सामील झाल्या आहेत.
'पॉज जायंट एआय एक्सपेरिमेंट्स' शीर्षकाच्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, ‘मानव-प्रतिस्पर्धी बुद्धिमत्तेसह एआय प्रणाली समाज आणि मानवतेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. शक्तिशाली एआय प्रणाली तेव्हाच विकसित केली पाहिजे जेव्हा आम्हाला खात्री असेल की त्यांचा प्रभाव सकारात्मक असेल आणि त्यांचे धोके आटोपशीर आहेत.’ खुल्या पत्रात असे नमूद केले आहे की AI लॅब्सनी किमान 6 महिन्यांसाठी GPT-4 पेक्षा अधिक शक्तिशाली AI प्रणालीचा विकास त्वरित थांबवावा. (हेही वाचा: Silicon Valley Bank Sold: First Citizens Bank ने विकत घेतली Silicon Valley Bank; $500 Million चा व्यवहार)
दरम्यान, मस्क हे OpenAI मध्ये सुरुवातीचे गुंतवणूकदार होते आणि अनेक वर्षांपासून ते तिच्या बोर्डाचे सदस्य होते. मस्कने त्यांची कार फर्म टेस्लाच्या सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाला सामर्थ्य देण्यासाठी एआय प्रणाली विकसित केली होती. मात्र आता ज्याप्रकारे एआयचा वापर वाढला आहे ते पाहून मस्क आणि इतर अनेक तंत्रज्ञान तज्ञांना एआयचा विकास थांबवायचा आहे.