Amazon वरून अंमली पदार्थांची तस्करी; व्हॅन चालक आणि दोन पिकअप बॉयकडून जप्त केला 48 किलो गांजा
या लोकांनी Amazon वरून गांजाची प्रत्येकी 384 पाकिटे घेऊन परिसरात पुरवली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर (Amazon) अंमली पदार्थांची (Drugs) विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. गांजाच्या (Marijuana) ऑनलाइन तस्करीप्रकरणी भिंड पोलिसांकडून अॅमेझॉन कंपनीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. आता विशाखापट्टणम पोलीस आणि एसीबी (स्पेशल एन्फोर्समेंट ब्युरो) यांनी रविवारी रात्री उशिरा भिंड पोलिसांच्या सांगण्यावरून अॅमेझॉन कंपनीच्या ऑनलाइन व्हॅन चालक आणि पिकअप बॉयला 48 किलो गांजा आणि इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांसह पकडले. या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी भिंड पोलीस विशाखापट्टणमकडे रवाना झाले आहेत.
यांच्याकडून अॅमेझॉन सेलो टेप आणि खाकी पाकिटेही जप्त करण्यात आली आहेत. आरोपींना रिमांडवर भिंड येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना मंगळवारी भिंड येथे आणले जाऊ शकते. एसपी मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, 13 नोव्हेंबर 2021 रोजी पोलिस स्टेशन गोहड चौराहाच्या पथकाने पिंटू उर्फ बिजेंद्र तोमर रा. छिमका- पोलीस स्टेशन गोहद चौराहा, सूरज उर्फ कल्लू पवैया रहिवासी आझाद नगर, मुरार, ग्वाल्हेर यांना 21 किलो 734 ग्रॅम गांजासह पकडले होते. या प्रकरणातील अन्य आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या चौकशीत सूरजने सांगितले की, त्याने मुकुल जैस्वालच्या माध्यमातून अॅमेझॉनवर बाबू टॅक्सच्या नावाने सेलर फर्मची नोंदणी केली आहे. ते Amazon वरून त्यांच्या निवडक ग्राहकांना ऑनलाइन गांजा पाठवतात. आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते चिल्कापती श्रीनिवास राव उर्फ वासू, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश याच्याकडून गांजा घेत असत. वासूने कल्लू आणि मुकुलला विशाखापट्टणमच्या कांचनपलेममध्ये भाड्याने खोली दिली होती. या खोलीत वासू दोन किलो गांजाची पाकिटे बनवून अॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयला देत असे. (हेही वाचा: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात आलेली रसायने अॅमेझॉनवरून मागवली होती: CAIT)
सूरज पवैया आणि मुकुल जैस्वाल यांची चौकशी केल्यानंतर भिंड पोलिसांनी अॅमेझॉनवरून ऑनलाइन गांजा मागवून तो स्थानिक पातळीवर पुरवणाऱ्या 33 जणांची यादी तयार केली आहे. या लोकांनी Amazon वरून गांजाची प्रत्येकी 384 पाकिटे घेऊन परिसरात पुरवली आहेत.