Apple Event September 2026 Date Announced: अॅपल च्या 'Surprise and Shine' ची तारीख अखेर जाहीर; नव्या प्रोडक्टस ची उत्सुकता शिगेला
अॅपलने आपल्या पुढील उत्पादन लाँच कार्यक्रमाची तारीख जाहीर केली असून, 'सरप्राईज अँड शाईन' या टॅगलाईनखाली ९ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. आयफोन १८ मालिकेसह अॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन आणि नवे स्मार्टवॉच सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Apple च्या सप्टेंबरमधील वार्षिक कार्यक्रमाकडे दरवर्षी जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींचे लक्ष लागलेले असते, कारण याच कार्यक्रमात कंपनी आपली नवी आयफोन मालिका सादर करते. यंदा Apple ने आपल्या पुढील उत्पादन लाँच कार्यक्रमाची अखेर घोषणा केली असून, हा कार्यक्रम 9 सप्टेंबर रोजी 'सरप्राईज अँड शाईन' (Surprise and Shine) या टॅगलाईनखाली होणार आहे. अमेरिकेतील पॅसिफिक प्रमाण वेळेनुसार सकाळी 10 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता) हा कार्यक्रम सुरू होणार असून, यूट्यूब, अॅपलचे संकेतस्थळ आणि अॅपल टीव्हीवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
अधिकृतपणे काय जाहीर, काय अपेक्षित
अॅपलने या कार्यक्रमात नेमकी कोणती उत्पादने सादर होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र उद्योगक्षेत्रातील अंदाजांनुसार, आयफोन 18 सीरीज सादर होण्याची दाट शक्यता आहे. काही अहवालांमध्ये अॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोनही याच कार्यक्रमात सादर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला असला, तरी कंपनीने कोणत्याही नव्या हार्डवेअरची अद्याप पुष्टी केलेली नाही.
प्रचारात्मक डिझाइनमागील संकल्पना
दरवर्षीप्रमाणे यंदाही अॅपलने कार्यक्रमासाठी खास प्रचारात्मक डिझाइन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये 'सरप्राईज अँड शाईन' ही टॅगलाईन आणि कंपनीचा लोगो चमकत्या निऑन इफेक्टमध्ये दाखवण्यात आला आहे. या डिझाइनमध्ये पांढऱ्या निऑन शैलीचा वापर करण्यात आला असून, हीच शैली अॅपलने यापूर्वी याच वर्षी झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०२६ मध्ये सिरी एआय बीटा सादर करताना वापरली होती.
स्मार्टवॉच आणि स्मार्ट होम उत्पादनांचीही शक्यता
आयफोन मालिकेसोबतच अॅपल वॉच सिरीज १२ आणि अॅपल वॉच अल्ट्रा हे नवे स्मार्टवॉच मॉडेल्सही याच कार्यक्रमात सादर होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही नवीन स्मार्ट होम उपकरणेही सादर केली जाऊ शकतात, असे तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
अॅपलने आपल्या यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाची थेट प्रक्षेपण लिंकही अपलोड केली असून, त्याच्या वर्णनात "९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता (पॅसिफिक वेळेनुसार) होणाऱ्या खास कार्यक्रमात आमच्यासोबत सहभागी व्हा" असे नमूद करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील अॅपल पार्क कॅम्पसमध्ये होणार आहे.
कॅमेरायुक्त एअरपॉड्सचे लाँचिंग लांबणीवर
दरम्यान, ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, अॅपलच्या कॅमेरायुक्त एआय एअरपॉड्सचे लाँचिंग २०२७ पर्यंत लांबणीवर पडले आहे. अलीकडेच एका लीक व्हिडिओमुळे हे उत्पादन लवकर सादर होण्याची अटकळ बांधली जात होती, मात्र त्या तर्कांना छेद देत लाँचिंगची मूळ योजना २०२७ सालीच कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या नव्या एअरपॉड्सद्वारे अॅपल एआय वेअरेबल्स क्षेत्रात प्रवेश करू पाहत आहे. या वर्षी वसंत ऋतूत अॅपलच्या कर्मचाऱ्यांमध्ये या उत्पादनाची प्रगत चाचणी सुरू झाल्याचे ब्लूमबर्गने मे महिन्याच्या सुरुवातीला वृत्त दिले होते. मात्र उन्हाळ्यात उत्पादन प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न करताना पुरवठा साखळी आणि सॉफ्टवेअरशी संबंधित अडचणी आल्याने, कंपनीने हे उत्पादन २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे ब्लूमबर्गने जूनच्या मध्यात नोंदवले होते.
याच आठवड्यात मॅक संगणकांसाठीच्या एका डेव्हलपर सॉफ्टवेअर अद्यतनात चुकून अॅपलच्या आगामी काही उत्पादनांचे संदर्भ आढळून आले, ज्यामध्ये कॅमेरायुक्त एअरपॉड्सचा प्रत्यक्ष वापर दाखवणाऱ्या व्हिडिओचाही समावेश होता. मॅकरुमर्सने प्रथम प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओने, हे एअरपॉड्स 'व्हिज्युअल इंटेलिजन्स' या फीचरवर आधारित असतील, या ब्लूमबर्गच्या आधीच्या वृत्ताला दुजोरा दिला. या फीचरद्वारे कॅमेऱ्यांच्या साहाय्याने प्रत्यक्ष जगातील वस्तूंचे विश्लेषण करून त्यावर कृती करता येते.