IPL Auction 2025 Live

Tata Mumbai Marathon: 15 जानेवारी 2023 होणार आशियातील सर्वात मोठी 'टाटा मुंबई मॅरेथॉन' स्पर्धा; 'या' ठिकाणी करू शकाल नोंदणी

सर्वांना एकाच मंचावर आणण्याठी मॅरेथॉन हे एक उत्तम माध्यम आहे.

Tata Mumbai Marathon (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) ही स्पर्धा 15 जानेवारी 2023 मध्ये होणार असून या स्पर्धेसाठी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. हॉटेल ट्रायडंट येथे टाटा मुंबई मॅरेथॉन नोंदणी शुभारंभाची घोषणा करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादा होत्या. तथापि, सध्या जनजीवन पूर्वपदावर आल्याने मोठ्या कालावधीनंतर, सर्व स्पर्धकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मॅरेथॉन 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटू आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना आता या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेत 50 हजारांहून अधिक हौशी तसेच व्यावसायिक धावपटू जगभरातून सहभागी होतील, ही स्पर्धा अधिक आकर्षक होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वांना एकाच मंचावर आणण्याठी मॅरेथॉन हे एक उत्तम माध्यम आहे. सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रीटी, लोकप्रतिनिधी देखील या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवतील, अशी आशा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. (हेही वाचा: Mumbai Indians ने UAE, South Africa टी20 लीग मध्ये दोन नवीन फ्रेंचायझीच्या नावाची घोषणा केली)

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर, टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट, टाटा सन्सचे उपाध्यक्ष उज्ज्वल माथूर, आयडीएफसी बँकेचे मुख्य कार्यअधिकारी बी. माधवन आदींनी मनोगत व्यक्त केले तसेच अधिकाधिक धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी tatamumbaimarathon.procam.in या अधिकृत वेब पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन टाटा सन्सचे ब्रँड संरक्षक हरीश भट यांनी केले.