Thailand Open: सायना नेहवाल, किदांबी श्रीकांत गारद; साई प्रणीत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

तर बी.साई प्रणीत (B Sai Praneeth) याने पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत गाठली आहे.

सायना नेहवाल

भारतीय बॅडमिंटनची राणी सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि किदांबी श्रीकांत (Kidami Srikanth) यांना गुरुवारी थायलंड ओपनच्या (Thailand Open) पूर्व-क्वार्टर फायनल फेरीत पराभव पत्करावा लागला. सातव्या मानांकित सायनाला पुनरागमनामध्ये विशेष छाप सोडता आली नाही. दोन महिन्यांनंतर बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सायनाला जपानच्या बिगरमानांकित सयाका ताकाशाहीविरुद्ध 21-16, 11-21, 14-21 ने पराभव स्वीकारावा लागला. सायनाला एक गेमच्या मिळवलेल्या आघाडीचा तिला लाभ घेता आला नाही. सायनाला तीन गेममध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. (Euro T10 लीगमध्ये तुफान आलया, अहमद नबी याने अवघ्या 28 चेंडूत शतक ठोकत रचला विश्वविक्रम)

दुसरीकडे, तर बी.साई प्रणीत (B Sai Praneeth) याने पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरीत गाठली आहे. साईने आपल्या कामगिरीत सातत्य राखत शुभंकर डे (Shubankar Dey) याचा 21-18, 21-19 ने पराभव करत अंतिम आठमध्ये स्थान निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीत साईसमोर जपानच्या सातव्या मानांकित कांता सुनेयामा याचे आव्हान असेल. पारुपल्ली कश्यप देखील तिसऱ्या मानांकित चोऊ टिएन चेन विरुद्ध अपयशी ठरला. कश्यपला 9-21, 14-21 ने पराभूत झाला.

पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीत देखी भारतासाठी चांगले वृत्त आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियाच्या फजर अलफिया व मोहम्मद रिया आर्दियांतो या जोडीचा 21-17, 21-19 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. रंकीरेड्डी आणि शेट्टी यांचा पुढील सामना कोरियाच्या चोई सोलग्यू व सियो सेयुंग जाए या जोडीविरुद्ध असेल. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि रंकीरेड्डी यांच्या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली. पण दुसऱ्या मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीला हाँगकाँगच्या टांग चुन मान व से यिंग सुएत या आठव्या मानांकित जोडीविरुद्ध 16-21, 11-21 ने पराभवाला सामोरे जावे लागले.