Padma Awards 2020-21: या क्रीडा व्यक्तिमत्त्वांचा राष्ट्रपतींकडून गौरव, PV Sindhu हिला पद्मभूषण तर मेरी कोमला पद्मविभूषण
यंदा हे पुरस्कार दोन वर्षांसाठी दिले जात आहेत. यामध्ये 2020 आणि 2021 च्या पुरस्कारांचा समावेश आहे. यादरम्यान क्रीडा क्षेत्रात मौल्यवान योगदान दिलेल्या व्यक्तींनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एकूण सात क्रीडा व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत.
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते सोमवारी पद्म पुरस्कारांचे (Padma Awards) वितरण करण्यात आले. यंदा हे पुरस्कार दोन वर्षांसाठी दिले जात आहेत. यामध्ये 2020 आणि 2021 च्या पुरस्कारांचा समावेश आहे. यादरम्यान क्रीडा (Sports) क्षेत्रात मौल्यवान योगदान दिलेल्या व्यक्तींनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एकूण सात क्रीडा व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. भारताची सर्वात यशस्वी महिला बॉक्सर MC मेरी कोम (Mary Kom) हिला पद्मविभूषण-2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने पाच वेळा जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक तसेच एक रौप्य आणि कांस्य पदक पटकावले आहे. तसेच यंदा टोकियो ऑलिम्पिक खेळत कांस्य पदक जिंकणारी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये बॅडमिंटन एकेरीत तिने रौप्य पदक जिंकले होते. एकेरी स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली महिला आणि एकूण दुसरी खेळाडू आहे. (Padma Shri Award 2020: सुषमा स्वराज, अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण)
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानला (Zaheer Khan) पद्मश्री पुरस्कार-2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. झहीर खान भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. 2011 वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा तो सदस्य होता. तसेच मणिपूरची फुटबॉलपटू ओइनम बेंबिम देवी हिला पद्मश्री पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय महिला फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेण्यात बेंबिम देवीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताचे माजी हॉकीपटू एम.पी. गणेश यांनाही पद्मश्री पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. 1972 म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात गणेश यांचा सहभाग होता. भारतातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांपैकी एक जितू राय यांना पद्मश्री पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले असून त्याने 2014 आणि 2018 मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. याशिवाय 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय तिरंदाज तरुणदीप राय यालाही पद्मश्री पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. तरुणदीपनेही देशासाठी चांगले यश मिळवले आहे. आशियाई खेळ 2006 मध्ये त्याने कांस्यपदक जिंकले. या खेळांमध्ये सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकण्यात त्याला यश आले.
दरम्यान, पद्मश्री पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचाही (Rani Rampal) समावेश आहे. राणीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक यश मिळवले आहेत. तिच्या नेतृत्वात यंदा भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. संघाला पराभव पत्कारावा लागला असला तरी त्यांच्या खेळीचा आणि जिद्दीचा संपूर्ण देशवासियांकडून कौतुक करण्यात आला होता.