Tata Mumbai Marathon 2024: पुढील वर्षी 21 जानेवारीला होणार प्रतिष्ठित टाटा मुंबई मॅरेथॉन; आजपासून सुरु झाली नोंदणी
यावेळी ही स्पर्धा जगातील पहिल्या दहा मॅरेथॉन पैकी एक झाली, याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
टाटा मुंबई मॅरेथॉनची (Tata Mumbai Marathon) 19वी आवृत्ती पुढील वर्षी 21 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. यासाठीची नोंदणी आज गुरुवारीपासून सुरू झाली. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे दोन वर्षांनंतर मुंबई मॅरेथॉन गेल्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी यामध्ये सुमारे 55,000 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आता 2024 मध्ये होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी नोंदणी 10 ऑगस्टपासून सुरू झाली आणि 30 नोव्हेंबरपर्यंत किंवा सर्व जागा भरेपर्यंत चालणार आहे.
हाफ मॅरेथॉनसाठी 12 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होईल आणि 25 सप्टेंबरपर्यंत चालेल. मॅरेथॉन दरम्यान, अर्ध मॅरेथॉनमध्ये अपंगांसाठी मर्यादित जागा राखीव असतील. यासह अधिक महिला धावपटूंची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी, पूर्ण आणि अर्ध मॅरेथॉनमध्ये महिला धावपटूंसाठी मर्यादित जागा राखीव आहेत.
खुली 10 किमीची मॅरेथॉन चॅरिटीसाठी असेल आणि त्यासाठीची नोंदणी 16 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरपर्यंत किंवा सर्व जागा भरेपर्यंत चालेल.
ड्रीम रन (5 किमी), सिनियर सिटीझन रन आणि चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटीसाठी नोंदणी 18 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. यादरम्यान 'व्हर्च्युअल रेस'ही होणार आहे. पूर्ण मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किमी आणि ड्रीम रन या प्रकारांमध्ये आभासी शर्यत आयोजित केली जाईल. यासाठी 1 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत नोंदणी होईल.
आज टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या नावनोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्यपाल बैस यांच्या स्वतःच्या नावनोंदणीने करण्यात आला. मुंबई मॅरेथॉन ही श्रीमंत, गरीब, शहरी, ग्रामीण, युवा, वृद्ध, स्त्री, पुरुष यांसारखे भेद मिटवणारी सर्वसमावेशक स्पर्धा आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा पुरस्कार करते. प्रत्येक गाव, शहर व महानगराची स्वतःची मॅरेथॉन सुरु झाल्यास त्यातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल व एकात्मता बळकट होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. (हेही वाचा: ST Employee Strike: एसटी चे कर्मचारी पुन्हा गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाच्या तयारीत)
मॅरेथॉनच्या माध्यमातून गेल्या 19 वर्षांमध्ये 700 अशासकीय सेवाभावी संस्थांनी सामाजिक उपक्रमांसाठी 356 कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. यावेळी ही स्पर्धा जगातील पहिल्या दहा मॅरेथॉन पैकी एक झाली, याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.