IPL Auction 2025 Live

Mike Tyson vs Jake Paul Fight: बॉक्सिंग जगतातील दिग्गज माईक टायसनचा तरुण बॉक्सर जेक पॉलशी होणार सामना; जाणून घ्या कुठे व कधी पाहाल लाईव्ह स्ट्रिमिंग

दोन्ही बॉक्सिंगपटूंचे वजन 113 किलोपेक्षा जास्त नसावे, अशी अट आहे.

Mike Tyson and Jake Paul (Credit: Twitter)

Mike Tyson vs Jake Paul: बॉक्सिंग जगतात माईक टायसन (Mike Tyson) हे एक लोकप्रिय नाव आहे. आता माईक टायसन जवळपास 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा रिंगमध्ये परतणार आहे. त्याचा सामना 27 वर्षीय तरुण बॉक्सर जेक पॉलशी (Jake Paul) होणार आहे, ज्याने आपल्या बॉक्सिंग कारकिर्दीत आतापर्यंत फक्त एकच सामना गमावला आहे. माईक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉक्सिंग सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे, ज्यावर चाहत्यांची नजर आहे. माईक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील हा सामना आर्लिंग्टन, टेक्सास, यूएसए येथील स्टेडियमवर खेळवला जाईल.

हा सामना  भारतातील टीव्हीवरील कोणत्याही नेटवर्कवर प्रसारित केला जाणार नाही. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार असून, तो नेटफ्लिक्सवर पाहता येईल. ही लढत 16 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6:30 वाजता सुरू होईल, जी भारतामध्ये नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम केली जाईल.

माइक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील लढत एकूण 8 फेऱ्यांपर्यंत चालेल, ज्यामध्ये प्रत्येक फेरी 2-2 मिनिटांची असेल. दोन्ही बॉक्सिंगपटूंचे वजन 113 किलोपेक्षा जास्त नसावे, अशी अट आहे. माईक टायसन वयाच्या 58 व्या वर्षी बॉक्सिंगच्या या सामन्यात उतरत आहे, जेक पॉलचे वय त्याच्या निम्मे आहे. तो  केवळ 27 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत टायसनला जेक पॉलचा सामना करणे सोपे जाणार नाही. माईक टायसनने त्याच्या कारकिर्दीत एकूण 58 फाईट्स खेळल्या आहेत, ज्यापैकी त्याने 50 फाईट्स जिंकल्या आहेत, तर जेक पॉलने 11 पैकी 10 फाइट जिंकल्या आहेत. (हेही वाचा: Imane Khelif: महिला असल्याचे भासवून ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी इमान खलीफ वैद्यकीय अहवालात निघाली पुरुष, पदक परत घेण्याची लोकांची मागणी)

या दोन्ही बॉक्सर्सना ही लढत खेळण्यासाठी प्रचंड पैसा मिळत आहे. माइक टायसनला एका सामन्यासाठी 20 मिलियन डॉलर्स म्हणजेच 168 कोटी रुपये मिळत आहेत. माईक टायसन हा सामना जिंकला किंवा हरला तरी त्याला ही रक्कम मिळेल. दुसरीकडे, जेक पॉलला टायसनपेक्षा दुप्पट पैसे मिळत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जेक पॉलला या एका फाईटसाठी 40 मिलियन डॉलर्स मिळत आहेत, जे भारतीय चलनात 337 कोटी रुपये आहेत. जेक पॉल हा खेळाडू 6 फूट एक इंच उंच आहे. माइक टायसनची उंची 5 फूट 10 इंच आहे.