Khelo India Youth Games मध्ये सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राने मारली बाजी; 78 सुवर्ण पदकांसह 256 पदके जिंकली
या 13 दिवसांच्या स्पर्धेत महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया युवा क्रीडा करंडक जिंकला आहे
खेलो इंडिया युथ गेम्सच्या (Khelo India Youth Games) तिसर्या सत्राची सांगता बुधवारी, रंगारंग सोहळ्याने झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र (Maharashtra) संघ 78 सुवर्ण पदकांसह 256 पदके जिंकून स्पर्धेचा विजेता ठरला. या 13 दिवसांच्या स्पर्धेत महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया युवा क्रीडा करंडक जिंकला आहे. हरियाणा 200 पदकांसह (68 सुवर्ण, 60 रौप्य व 72 कांस्यपदकांसह) दुसर्या स्थानावर आहे, तर दिल्लीने 122 पदके (39 सुवर्ण, 36 रौप्य व 47 कांस्य) सह तिसरे स्थान पटकावले.
10 जानेवारीपासून सुरू झालेल्या या खेळांमध्ये सुमारे 37 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील, सुमारे 6800 खेळाडूंनी भाग घेतला. या खेळांमध्ये 20 खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
अंडर -17 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत जलतरणपटू करीना शंकटाने दुसरे सुवर्णपदक जिंकले, ज्याद्वारे महाराष्ट्राने जलतरणमध्ये 18 सुवर्णांसह एकूण 46 पदके जिंकली. बॉक्सिंगच्या अंतिम सामन्यात हरियाणाच्या चार मुष्ठियोद्ध्यांचा पराभव झाला. कर्नाटकने अखेरच्या दिवशी बॉक्सर निशांत देश आणि टेनिसपटू रेश्मा मुरारीसह चार सुवर्ण जिंकले. या चार सुवर्णांसह त्यांनी उत्तर प्रदेशचा पराभव करत टेबलमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानले.
भारताचे प्रतिनिधित्व केलेले, श्रीहरी नटराजने 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदके जिंकली, अशाप्रकारे त्यांनी एकूण आठ पदके जिंकली. त्याने पाच सुवर्ण व तीन रौप्यपदक जिंकले. कर्नाटकने त्यांच्या 32 सुवर्ण पदाकांपैकी 21 जलतरणमध्ये जिंकली. आसामच्या शिवांगी शर्मा हिने पोहण्यात पाच सुवर्ण व दोन रौप्यपदक जिंकले. खेलो इंडिया यूथ गेम्समधील ती सर्वात यशस्वी महिला खेळाडू होती. हरियाणाने बॉक्सिंगमध्ये वर्चस्व राखले, इथल्या राज्य खेळाडूंनी 15 सुवर्ण व 14 रौप्यांसह 47 पदके जिंकली. (हेही वाचा: Khelo India Youth Games 2020: 200 पदकं जिंकत महाराष्ट्राने रचला इतिहास, 100 पदकांसह दिल्ली तिसऱ्या स्थानी)
पुडुचेरी आणि लडाख यांनीही अंतिम दिवशी पदक टेबलमध्ये स्थान मिळवले. या खेळांचे आयोजन करणार्या आसामच्या खेळाडूंनी 20 सुवर्ण व 22 रौप्यांसह एकूण 76 पदके जिंकली. आसाम टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. पश्चिम बंगाल, गुजरात आणि पंजाबनेही अव्वल दहामध्ये स्थान मिळविले.