Khelo India Youth Games 2019: खेळाडूंची गोल्डन किमया; खेलो इंडिया स्पर्धेत 213 पदकांसह महाराष्ट्र अव्वल
पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने गोल्डन किमया केली आहे.
Khelo India Youth Games 2019: पुण्यातील (Pune) बालेवाडी क्रीडासंकुलात सुरु असलेल्या 'खेलो इंडिया युवा' स्पर्धेत महाराष्ट्राने गोल्डन किमया केली आहे. 213 पदकांसह 80 सुवर्ण पदकांची कमाई करत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. यात 59 रौप्य, 74 कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणा, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा नंबर लागतो.
महाराष्ट्राने हरियाणाला मागे टाकत पदक कमाईत बाजी मारली आहे. गेल्या वेळी हरयाणाने 38 तर महाराष्ट्राने 36 सुवर्ण पदकांची कमाई केली होती. यंदा हरयाणाला मागत टाकत महाराष्ट्राने स्पर्धेत सुरुवातीपासून असलेले अव्वल स्थान टिकवले आहे. जलतरणात महाराष्ट्राने सर्वाधिक म्हणजे 18 सुवर्णपदकांची कमाई केली. तर जिम्नॅस्टिकमध्ये 14 सुवर्णपदके पटकावली.
अॅथलेटिक्समध्ये 13 सुवर्णपदकांची कमाई करण्यात महाराष्ट्राला यश आले. वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगमध्ये 9 सुवर्णपदकं तर खो-खो मध्ये 4 सुवर्णपदकं मिळवली. कुस्तीत केवळ चार सुवर्ण पदकांवर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्राची सुवर्ण किमया
# जलतरण - 18
# जिम्नॅस्टिक्स - 14
# अथलेटिक्स - 13
# वेटलिफ्टिंग - 9
# बॉक्सिंग - 9
# खो-खो- 4
# कुस्ती- 4
9-20 जानेवारीपर्यंत रंगलेल्या या खेलो इंडिया युवा स्पर्धेत यजमान असलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत अव्वल स्थान कायम राखले आहे.