अभिषेक वर्मा, ज्योती सुरेखा वेन्नम (Photo Credits: Twitter/India_AllSports)

भारताची मिश्र दुहेरी जोडी अभिषेक वर्मा (Abhishek Verma) आणि ज्योती सुरेखा वेन्नम (Jyoti Surekha Vennam) या जोडीने आज बँकॉकमध्ये झालेल्या 21 व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या (Asian Archery Championships) कंपाऊंड मिश्र स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि एकूण सात पदकं जिंकून दिली. वर्मा आणि ज्योतीने चिनी तैपेईच्या यी-सुसान चेन आणि चिह-लुह चेन यांना 158-151 ने पराभूत करून भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदक जिंकले. यापूर्वी वर्मा संघाने स्पर्धेत नेमके लक्ष्य गाठला नाही, त्यामुळे भारतीय संघाला कोरियाविरुद्ध एका गुणाने पराभूत करून रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कोरियाने हा सामना 233-2232 च्या फरकाने जिंकला. पुरुष संघात भारतीय गटात अव्वल मानांकित वर्मा, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज यांनी पहिल्या फेरीत 58 गुण मिळवले. कोरियाच्या जावन यांग, यांगी चोई आणि युन-क्यू चोई यांनीही समान गुण मिळवले.

दुसर्‍या फेरीत कोरियन संघाने भारतीय संघावर एक गुणाची आघाडी मिळवली. भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या फेरीतील शेवटचे तीन लक्ष्य नऊ गुणांसाठी लगावले. यामुळे, कोरियन संघाला तीन गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. अंतिम फेरीत कोरियाच्या 57 विरुद्ध भारताने 59 गुणांची नोंद केली परंतु ते जिंकण्यासाठी पुरेसे नव्हते. ज्योती, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर या भारतीय महिला संघाला विजेतेपद मिळवता आले नाही आणि कोरियाविरुद्ध एकतर्फी सामन्यात 231-215 असा पराभव पत्करावा लागला.

तिरंदाजी फेडरेशन ऑफ इंडियाच्या निलंबनामुळे भारताचे खेळाडू स्पर्धेतील वर्ल्ड आर्चरी असोसिएशनच्या ध्वजाखाली खेळत आहेत. गुरुवारी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत त्यांना भाग घेता यावा म्हणून त्याला ही संधी देण्यात आली. पुरुष संघाने यापूर्वीच वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ऑलिम्पिक कोटा मिळविला आहे, तर महिला संघ या स्पर्धेत ऑलिंपिक कोटा मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. टोकियोसाठी येथून सहा ऑलिम्पिक कोटा मिळू शकेल.