राष्ट्रीय खेळाडू, पद्मश्री अरूणिमा सिन्हावर खुनाचा आरोप करून, मेहुण्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; दोघांची भागीदारी असलेल्या कंपनीवरून वाद

ओम प्रकाश यांनी सरोजनीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाची चोकशी करत आहेत

Arunima Sinha (Photo Credits: @DrNausheenKhan/ Twitter)

उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होताच, एक धक्कादायक बातमी समोर आली. सकाळी सभागृहाची कार्यवाही सुरू होताच राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी त्यांचे भाषण वाचण्यास सुरवात केली. त्याचवेळी, एका व्यक्तीने आपल्या कुटुंबासमवेत असेंब्ली गाठली आणि आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले व ती आग विझवली.

यानंतर या युवकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा युवक 30 टक्के भाजला आहे. चौकशी दरम्यान हा युवक पद्मश्री पुरस्कारप्राप्त अरुणिमा सिन्हा (Arunima Sinha) यांचा मेहुणा ओम प्रकाश (Om Prakash) असल्याचे समोर आले.

ओम प्रकाशने अरुणिमा सिन्हा आणि तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. ओम प्रकाश यांनी सरोजनीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाची चोकशी करत आहेत. ओम प्रकाश यांचे म्हणणे आहे की, भागीदारी असलेल्या कंपनीमधील पैसे लाटण्यासाठी अरुणिमा आणि तिच्या पतीने ओम प्रकाशवर प्राणघातक हल्ला केला. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली असता, सरोजिनी नगर पोलिस ठाण्याचे दिनकर वर्मा 107/16 च्या कारवाईत दिरंगाई करत आहेत. अरुणिमा सिन्हा पद्मश्री आहे त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पहिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

याबाबत एफआयआर नोंदवावा अशी त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना सरोजिनी नगर पोलिसांवर विश्वास नाही. अरुणिमा सिन्हा आणि तिच्या नवऱ्याने, आपला 50 टक्के हिस्सा असलेली, अरुणिमा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा ताबा स्वतःकडे घेतला आहे. याच प्रकरणातून हा हल्ला करण्यात आल्याचे ओम प्रकाश यांनी सांगितले. ओम प्रकाशची पत्नी आणि अरुणिमा सिन्हाची बहीण हिनेही आपल्या पतीवर दोनदा हल्ला झाल्याचे सांगितले. याबाबत अनेकदा तक्रार करूनही पोलीस योग्य ती कारवाई करत नाहीत याबाबत पती-पत्नींनी दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, अरुणिमा सिन्हा ही भारताची राष्ट्रीय पातळीवरील माजी व्हॉलीबॉलपटू आणि एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला आहे.