WI vs ENG 2022: भारत दौऱ्यापूर्वी जेसन होल्डरचा धमाका, चार चेंडूत चार इंग्लंड फलंदाजांना पॅव्हिलियनमध्ये पाठवून रचला इतिहास; पहा Video
त्याने सोमवारी बार्बाडोस येथे 5 सामन्यांच्या मालिकेतील रोमहर्षक अंतिम टी-20 सामन्यात इंग्लंडवर 17 धावांनी विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने T20I मालिका 3-2 ने जिंकली. 30 वर्षीय होल्डरने या सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 27 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतल्या.
दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड (England) संघाविरुद्ध यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशी आपल्या नावे केली. बार्बाडोस (Barbados) येथे झालेल्या मालिकेच्या निर्णायक सामन्यात विंडीजचा घातक अष्टपैलू जेसन होल्डरने (Jason Holder) संघाच्या विजयात मुख्य भूमिका बजावली. होल्डरने रविवारी रात्री बार्बाडोस येथे इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक घेत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये हॅटट्रिक घेणारा होल्डर हा वेस्ट इंडिजचा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने 4 चेंडूत सलग 4 विकेट घेत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या सामन्यात इंग्लंडला 17 धावांनी पराभव पत्करावा लागला. 30 वर्षीय होल्डरने या सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत 4 षटकात केवळ 27 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतल्या. (West Indies Team: भारत दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडिज संघात फूट पडल्याचे वृत्त, CWI ने दिले स्पष्टीकरण; पहा काय म्हटले)
याशिवाय होल्डर चार सलग चेंडूत चार फलंदाजांना तंबूत पाठवणार चौथा आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, अफगाणिस्तानचा राशिद खान आणि आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने हा आश्चर्यचकित करणारा कारनामा केला आहे. कॉम्परने गेल्या वर्षीच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत चार चेंडूत 4 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान होल्डरबद्दल बोलायचे तर कॅरेबियन अष्टपैलूने ख्रिस जॉर्डन (7), आदिल रशीद (0) आणि शकीब महमूद (0) यांना बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. तर त्याने सॅम बिलिंग्ज (41) आणि कर्णधार मोईन अली (14) यांना पॅव्हिलियनमध्ये पाठवून सामन्यात विकेटचा पंजक पूर्ण केला. अखेरच्या षटकात त्याने हॅटट्रिक पूर्ण केली. त्याने इयन मॉर्गनच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या 34 वर्षीय अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला आपल्या जाळ्यात अडकवले आणि काइल मेयर्सने झेलबाद केले.
दुसरीकडे, क्रिकेटच्या झटपट फॉरमॅटमध्ये इंग्लंडला धूळ चारल्यावर विंडीज संघ आता भारत दौऱ्यावर येणार आहे. 6 फेब्रुवारीपासून दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. अशा परिस्थितीत होल्डरची ही घातक गोलंदाजी टीम इंडियासाठी मोठी डोकेदुख ठरू शकते. होल्डरने बॉलने असाच खेळ भारतात सुरु ठेवला तर रोहित शर्माच्या भारतीय संघाला काट्याची टक्कर मिळेल असे चित्र सध्या दिसत आहे.