Wasim Jaffer ची द्विशतकी किमया; म्हणून ठरला देशांतर्गत किक्रेट विश्वातील देव!
भारताचा पूर्वाश्रमीचा सलामीवीर वसीम जाफरने आज अजून एक कामगिरी केली.
भारताचा पूर्वाश्रमीचा सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) आज अजून एक कामगिरी केली. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये (Ranji Trophy quarter-final) उत्तराखंडविरुद्ध जाफरने द्विशतक झळकवले. बुधवारी त्याने 111 धावा केल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा उत्तराखंडच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने 206 धावांची भरीव कामगिरी केली. या द्विशतकात 26 चौकारांचा समावेश आहे. जाफरसोबतच संजय रामास्वामीने देखील शतक झळकावले. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत जाफरने आज नवव्यांदा 200 हून अधिक धावा करण्याची किमया केली.
देशांतर्गत क्रिकेट विश्वातील जाफर सर्वात सफल फलंदाज आहे. 408 डावात त्याने 18873 धावा केल्या आहेत. उत्तराखंडविरुद्ध द्विशतक पूर्ण केल्यानंतर जाफरला 40 वर्षांहून अधिक वयोगटातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील द्विशतक झळकवणारा पहिल्या आशियाई खेळाडूचा मान मिळाला आहे. भारतीय टीमसाठी जाफर 31 कसोटी सामने खेळाला असून त्यात त्याने 1,944 धावा केल्या आहेत.