Chandrayaan 2: ISRO च्या कामगिरीचा खेळाडूंनाही अभिमान, ट्विट करत केला अभिनंदनाचा वर्षाव
वीरेंद्र सेहवाग, हर्षा भोगले, सुरेश रैना आणि अन्य खेळाडूंनी इस्रोला त्यांच्या यशस्वी प्रकल्पाबद्दल प्रशंसा व्यक्त करत त्यांचा आदर केला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो (Indian Space Research Organisation) च्या बहुचर्चित चांद्रयान 2 (Chandrayaan 2) या भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाने अवकाशात झेप घेतली आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-2 याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. चांद्रयान-2 ला चंद्रावर पोहोचण्यासाठी 40 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार आहे. या ऐतिहासिक क्षणाची उत्सुकता भारतीयांमध्ये पाहायला मिळत आहे. चांद्रयान-2 अवकाशात झेप घेताच नेता, अभिनेता, खेळाडू आणि सामान्य नागरिकांनी इस्रो (ISRO) ला सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले. (Chandrayaan 2 Launch: ISRO च्या दुसऱ्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेची 10 खास वैशिष्ट्यं)
जीएसएलव्ही मार्क -3 द्वारे चांद्रयान-2 चे यशस्वी प्रक्षेपण झाले. आणि अवघ्या काही मिनिटांतच यान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन (K Sivan) यांनी दिली. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वीरेंद्र सेहवाग, हर्षा भोगले, सुरेश रैना आणि अन्य खेळाडूंनी इस्रोला त्यांच्या यशस्वी प्रकल्पाबद्दल प्रशंसा व्यक्त करत त्यांचा आदर केला आहे. पहा हे ट्विट्स:
चांद्रयान-2 ची मोहिम 15 जुलै रोजी पार पडणार होती पण काही तांत्रिक कारणांमुळे त्याचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. तसेच चंद्रयानाचे लँडर चंद्रावर उतरताच पहिल्या 15 मिनिटात तेथील पहिली झलक पाहता येईल असा विश्वास आहे. चंद्रावर लँडर उतरल्यापासून त्यातील रोव्हर बाहेर येण्यासाठी चार तासांचा अवधी लागणार आहे. चांद्रयानात विविध प्रयोगांसाठी लागणारी 13 वैज्ञानिक उपकरणे आहेत. चंद्रावरील खडकांचे फोटो घेऊन नंतर त्यात कॅल्शियम, मँग्नेशियम व लोह यांसारख्या धातूंचा अंश आहे की नाही त्याचा तपास घेतला जाईल.