COVID-19 Vaccine: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोनाची लस, ट्विटद्वारे दिली माहिती
ही लस घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण वैद्यकिय टीमचे ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आज कोरोनाची लस (COVID-19 Vaccine) घेतली. रवी शास्त्री यांनी ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. भारतात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात 50 वयोगटापुढील ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. तसेच 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त लोकांना देखील ही लस देण्यात येणार आहे. दरम्यान आज रवी शास्त्री यांनी कोरोनाची लस घेतली. ही लस घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण वैद्यकिय टीमचे ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
'आज मी कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला. कोरोना व्हायरसशी लढण्यात भारतातील वैद्यकिय कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी जे कार्य केले त्याने जगभरात देशाची मान उंचावली गेली आहे. या सर्वांचे मी आभार मानतो' अशा आशयाचे ट्विट रवि शास्त्री यांनी केले आहे.हेदेखील वाचा- COVID-19 Vaccine: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही घेतली कोरोनाची लस
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही काल (1 मार्च) रोजी कोरोना लसीचा पहिला डोस (COVID19 Vaccine First Dose) घेतला आहे. पंतप्रधान मोदी स्वत: सकाळी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी कोरोना लसीचा पहिवा डोस घेतला. यासह पीएम मोदींनी लोकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतल्यानंतर आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आहे. यात मोदींनी म्हटलं आहे की, 'मी एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुया, असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.