ICC Women’s T20 World Cup 2023 Schedule: भारत विरुद्ध पाकिस्तान होणार हाय व्होल्टेज सामना; येथे पहा टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
महिला टी-20 विश्वचषक 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. हरमनप्रीत कौरवर महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
T20 World Cup 2023 Schedule: फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकासाठी (Women's T20 World Cup) बुधवारी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या मेगा स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचा (IND vs PAK) एकाच गटात (B) समावेश आहे. 10 संघांच्या या स्पर्धेत प्रत्येकी पाच संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. महिला टी-20 विश्वचषक 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. हरमनप्रीत कौरवर महिला टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर स्मृती मानधना हिला संघाची उपकर्णधार बनवण्यात आली आहे. (हे देखील वाचा: Emerging Cricketer of the Year 2022: आयसीसीच्या महिला इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी भारताच्या Renuka Thakur आणि Yastika Bhatia यांना नामांकन)
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासह पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि आयर्लंडचा समावेश ब गटात करण्यात आला आहे. अ गटात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ अ गटात आहेत. टीम इंडिया 12 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. ग्रुप स्टेजमध्ये सर्व संघ चार सामने खेळतील. यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करतील. उपांत्य फेरीचे सामने 23 आणि 24 फेब्रुवारीला आणि स्पर्धेचा अंतिम सामना 26 फेब्रुवारीला खेळवला जाईल.
टीम इंडिया सामन्यांचे वेळापत्रक
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान - 12 फेब्रुवारी, केपटाऊन
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज - 15 फेब्रुवारी, केपटाऊन
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड - 18 फेब्रुवारी, सेंट जॉर्ज पार्क, गेकेबेरा
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड - 20 फेब्रुवारी, सेंट जॉर्ज पार्क, गेकेबेरा
टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया लंडनमध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेसोबत तिरंगी मालिका खेळणार आहे. ही तिरंगी मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार असून तिचा अंतिम सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्डकपच्या तयारीची ही शेवटची संधी असेल. या तिरंगी मालिकेचा फायदा टीम इंडियाला मिळू शकतो. अलीकडेच ऑस्ट्रेलियाने मायदेशात येऊन टी-20 मालिकेत टीम इंडियाचा 4-1 असा पराभव केला. अशा स्थितीत हरमनप्रीत ब्रिगेड आपली तयारी मजबूत करून या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला रवाना होऊ इच्छित आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.
राखीव खेळाडू : साभिनेनी मेघना, स्नेह राणा, मेघना सिंह.