T20 World Cup 2021: विराट कोहलीचा विक्रम मोडण्यात बाबर आजम अपयशी, डेविड वॉर्नर होणार का पास? हे आहेत विश्वचषक 2021 चे मोठे Run-Scorers
पण, उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर आता विराटचा विक्रम त्याच्याकडून मोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याच्याकडून विराट कोहलीचा विक्रम मोडण्याच्या आशा वाढल्या आहेत.
पाकिस्तानचा (Pakistan) स्टार कर्णधार आणि फलंदाज बाबर आजम (Babar Azam) यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेत भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आला होता. पण, उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर आता विराटचा विक्रम त्याच्याकडून मोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पाकिस्तानला लोळवून अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) याच्याकडून विराट कोहलीचा विक्रम मोडण्याच्या आशा वाढल्या आहेत. विराट कोहलीचा हा विक्रम टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा (Most Runs in Single Edition) करण्याचा आहे. विराटने 2014 विश्वचषकात त्याने सर्वाधिक 319 धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी विराटने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचा 2009 मध्ये 317 धावांचा विक्रम मोडला. यंदा बाबरला संधी होती कारण त्याने 6 सामन्यात 303 धावा केल्या होत्या. मात्र उपांत्य फेरीतील पाकिस्तानच्या पराभवाने त्याच्याकडून ही संधी हिरावून घेतली आहे. (T20 World Cup 2021: सेमीफायनलमध्ये पराभवानंतर Babar Azam चा खेळाडूंना खास सल्ला, म्हणाला- ‘कोणत्याही खेळाडूवर कोणी बोटे उचलू नये’)
दुबई आंतरराष्टीय क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी T20 विश्वचषक 2021 चा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. आणि या सामन्यात विराट कोहलीचा विक्रम मोडणारा एकमेव फलंदाज डेविड वॉर्नर आहे. मात्र, यासाठी त्याला अंतिम फेरीत आणखी 84 धावा कराव्या लागतील. वॉर्नरने सध्या 6 सामन्यात 234 धावा आहेत आणि सध्याच्या T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, यंदाच्या टी-20 विश्वचषक 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाकिस्तानच्या सलामीवीरांनी उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर वर्चस्व राखले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम 303 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्याचा सलामी जोडीदार मोहम्मद रिझवान 281 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत एकमेव शतक करणारा इंग्लंडचा जोस बटलर 6 सामन्यात 269 धावा करून तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच श्रीलंकेचा चरिथ असालंका 6 सामन्यात 231 धावांसह 5 व्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीचा टी-20 विश्वचषकमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी सध्या वॉर्नर हा एकमेव सक्रिय फलंदाज आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक फायनलमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे तर न्यूझीलंड पहिल्यांदा स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. उल्लेखनीय आहे की कांगारू संघाने यापूर्वी कधीही टी-20 जेतेपद जिंकलेले नाही, त्यामुळे यंदा क्रिकेट विश्वाला नवा चॅम्पियन मिळणार हे नक्की आहे.