IND vs WI: टीम इंडियाविरुद्ध पहिल्या दोन टी-20 सामन्यासाठी सुनील नारायण, केरन पोलार्ड यांची वेस्ट इंडिज संघात वर्णी

सुनील नारायण आणि केरन पोलार्ड यांनी पुन्हा संघात स्थान मिळवले आहे. तर 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलला मात्र डच्चू दिला आहे.

(Photo Credit: Getty Image)

भारतीय संघ (Indian Team) आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी सज्ज आहे. रविवारी विंडीजविरुद्ध मालिकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडेच असल्याचे स्पष्ट झाले. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. यादरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामने खेळणार आहे. यंदाच्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर, नवदीप सैनी, राहुल आणि दीपक चाहर यासारख्या खेळाडूंना टीम इंडियात स्थान मिळाले आहे. दरम्यान, नुकतेच वेस्ट इंडिजने पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे.

पहिल्या दोन टी-20 सामन्यासाठी सुनील नारायण (Sunil Narine) आणि केरन पोलार्ड (Kieron Pollard) यांनी पुन्हा संघात स्थान मिळवले आहे. तर विश्वचषकमध्ये दुखापतग्रस्त झालेला आंद्रे रसेल (Andre Russell) यालाही संघात घेण्यात आले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघातले पहिले दोन टी-20 सामने फ्लोरिडा (Florida) मध्ये खेळले जातील. तर तिसरा आणि अंतिम ती-20 सामना गुयाना (Guyana) मध्ये खेळवला जाईल.

वेस्ट इंडिज संघात एक नवीन चेहरा देखील घेण्यात आला आहे. विकेटकीपर-फलंदाज अँथनी ब्रॅमबल याला या मालिकेदरम्यान टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. अलीकडे, ब्रॅमबलला सीपीएल गुयाना ऍमेझॉन वॉरियर्सने आपल्या संघात घेतले होते. ब्रॅमबलने 12 टी 20 सामने आणि ए श्रेणी क्रिकेटमध्ये 46 सामने खेळले आहे. शिवाय, गेल्यावर्षीच्या जागतिक टी -20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्रॅबलने वेस्टइंडीज ब संघाचे नेतृत्व केले होते.

असा आहे वेस्ट इंडिज संघ:

कार्लोस ब्रॅथवाइट (कॅप्टन), जॉन कॅम्पबेल, इव्हिन लुईस, शॅमरॉन हेटमेयर, निकोलस पूरन, केरन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, किमो पॉल, सुनील नारायण, शेल्डन कॉटरेल, ओशन थॉमस, अँथनी ब्रॅमबल (विकेटकीपर), आंद्रे रसेल, आणि खारी पियरे.