पितृदिन 2020 निमित्त 'Thank You For Everything' म्हणत सचिन तेंडुलकर याची बाबांसाठी खास पोस्ट

'Thank You For Everything' सचिनने बाबांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sachin Tendulkar with his father (Photo Credits: Facebook)

प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे स्नान अगदी खास असते. आईबद्दल फार लिहिले, बोलले जाते पण बाबांबद्दल सहसा कोणी फारसं व्यक्त होत नाही. पूर्वी बाबांचा आदरयुक्त धाक असायचा. त्यामुळेही बाबांबद्दलच्या भावना फारशा मोकळेपणाने व्यक्त करता आल्या नसतील. परंतु, अलिकडे काळ बदलला असल्याने बाबा हे मित्र झाले आहेत. त्यामुळे बाबांशी मोकळा संवाद होणे शक्य झाले आहे. प्रत्येकाचे बाबा हे स्वाभाविकच वेगळे असणार आणि त्यांच्यासोबत असलेले प्रत्येकाचे नातेही तितकेच निराळे. परंतु, प्रेम, आदर, आपुलकी या भावना मात्र एकच. पितृदिनानिमित्त वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. आज पितृदिनानिमित्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने बाबांसाठी खास पोस्ट केली आहे.

आज जगभरात पितृदिन साजरा केला जात आहे. त्याचचं औचित्य साधत सचिन तेंडुलकरने बाबांना धन्यवाद दिले आहे. "आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही तात्पुरती तुमच्यासोबत राहते. पण तुमचा स्वभाव कायम तुमच्यासोबत राहतो. त्यामुळे प्रथम चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करा. तुमचा हा सल्ला आणि तुम्ही दिलेली मुल्यं मी कायम स्मरणात ठेवेन. सगळ्यासाठी धन्यवाद," असे सचिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. सोबत बाबांसोबतचा छानसा फोटो शेअर करत त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (पितृदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश, Quotes, SMS, Images, Messages, आणि शुभेच्छापत्रं देत साजरा करा आजचा फादर्स डे!)

सचिन तेंडुलकर पोस्ट:

यापूर्वी अनेक मुलाखती, चर्चासत्र यातून सचिन तेंडुलकर त्याच्या बाबांविषयी बोलला आहे. त्याच्या आयुष्यातील बाबांचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्याच्या चाहत्यांना नक्कीच आहे. आजही पितृदिनाचे औचित्य साधत त्याने बाबांनी रुजवलेले संस्कार तो कायम लक्षात ठेवले, असे सांगितले आहे.