SA vs ENG T20I: डेविड मलान-जोस बटलर यांची विक्रमी भागीदारी, इंग्लंडच्या 9 विकेट विजयाने दक्षिण आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव

जोस बटलर आणि डेविड मलान यांच्यातील विक्रमी भागीदारीच्या बळावर इंग्लंडने 18 ओव्हरमध्ये 192 धावांचे लक्ष्य गाठले आणि मोठा विजय मिळवला.

डेविड मलान-जोस बटलर, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: Twitter/ICC)

SA vs ENG T20I: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी बजावली आणि केप टाऊनच्या न्यूलँड्स (Newlands) स्टेडियममध्ये यजमान संघावर 3-0 ने क्लीन स्वीप नोंदवला. जोस बटलर (Jos Buttler) आणि डेविड मलान (Dawid Malan) यांच्यातील विक्रमी भागीदारीच्या बळावर इंग्लंडने 18 ओव्हरमध्ये 192 धावांचे लक्ष्य गाठले आणि मोठा विजय मिळवला. मलानने 49 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 99 धावा केल्या तर बटलर 43 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 65 धावा करून परतला. या दोघांनी टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक 167 धावांची अखंड भागीदारी नोंदवली. शिवाय, मलानने इंग्लंड खेळाडूने आफ्रिका संघाविरूद्ध सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदविली. यापूर्वी पार्ल (Parl) येथील दुसऱ्या सामन्यात मलानने 55 धावांचा डाव खेळला होता.

मलान आणि बटलरच्या जोडीने रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि फाफ डू प्लेसिस यांच्या जोडीला पराभवाचा धक्का दिला ज्यांनी चौथ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली आणि टीमला 3 विकेट गमावून 191 धावांची विशाल धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. व्हॅन डर ड्यूसेनने केवळ 32 चेंडूंत 5 चौकार आणि तितक्याच षटकारांसह नाबाद 74 धावा फटकावल्या तर डु प्लेसिस 37 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 52 धावा करून नाबाद परतला. पण इंग्लंडने न्यूलँड्समधील सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग करत जोडीचे प्रदर्शन व्यर्थ ठरवले. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग तिसरा पराभव होता. त्यापूर्वी इंग्लंडने सलामीच्या सामन्यात 5 विकेट तर पार्ल येथील दुसऱ्या सामन्यात 4 विकेटने विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे तर या सामन्यात देखील त्यांचे खराब प्रदर्शन कायम राहिले. एनरिच नॉर्टजेला एकमात्र विकेट मिळाली ज्याने जेसन रॉयला 16 धावांवर एलबीडब्ल्यू बाद करून माघारी धाडलं. नाणेफेक जिंकण्यापूर्वी कर्णधार क्विंटन डी कॉकने फलंदाजीचा निर्णय घेतला. डी कॉक 17 धावा करून क्रिस जॉर्डनचा शिकार बनला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 2 आणि जॉर्डनला एक विकेट मिळाली.