PC-X

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, TATA Indian Premier League 2025 Final Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा विजेता जाहीर झाला आहे. आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज म्हणजेच 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. यासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने पुन्हा एकदा निराशा केली आहे. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे.

या हंगामाच्या सुरुवातीपासूनच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शानदार कामगिरी केली. आरसीबीकडे प्रत्येक सामन्यासाठी वेगळा मॅच विनर होता. ज्यावरून असे दिसून आले की आरसीबी संघ या हंगामात कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नव्हता. दरम्यान, या हंगामात आरसीबीने केलेल्या विक्रमांबद्दल जाणून घेऊयात.

आरसीबीने आयपीएल 2025 मध्ये हे मोठे विक्रम केले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या हंगामात एकूण 11 सामने जिंकले. आयपीएलच्या एकाच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मिळवलेल्या विजयांची ही सर्वाधिक संख्या आहे.

या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 6154 दिवसांनी (16 वर्षे, 10 महिने आणि 6 दिवस) चेपॉकवर पहिला विजय नोंदवला.

या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3619 दिवसांनी (9 वर्षे १० महिने आणि २७ दिवस) वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला.

या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एकूण नऊ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार मिळाला. यासह, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा दुसरा संघ बनला आहे. या यादीत मुंबई इंडियन्स संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 2017 मध्ये मुंबई इंडियन्सने 10 पुरस्कार जिंकले होते.