Ravi Shastri टीम इंडियाची साथ सोडण्याची शक्यता, T20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट संघात होणार बदल; ‘हे’ 4 दिग्गज बनू शकतात प्रशिक्षक पदाचे दावेदार
आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर, भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून बाहेर पडू शकतात. बीसीसीआयला देखील टीम इंडियासाठी नवीन कोचिंग स्टाफ हवा आहे. अशास्थितीत रवी शास्त्रीऐवजी टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्यासाठी 4 दिग्गज क्रिकेटपटू मोठे दावेदार ठरू शकतात.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 नंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल होऊ शकतो. आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर, भारताचे (India) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून बाहेर पडू शकतात. विशेष म्हणजे इंडियन एक्सप्रेसच्या अहवालात खुलासा झाला आहे की शास्त्रींनी बीसीसीआयच्या काही सदस्यांना आधीच सूचित केले आहे की, टी-20 विश्वचषकानंतर ते टीम इंडिया (Team India) पासून वेगळे होण्याचा विचार करत आहेत. लक्षात घेण्यासारखे म्हणजे शास्त्री यांचा करार टी-20 वर्ल्ड कपनंतर नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. (Rahul Dravid: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीबाबत राहुल द्रविडचे मोठे विधान)
दुसरीकडे, बीसीसीआयला देखील टीम इंडियासाठी नवीन कोचिंग स्टाफ हवा आहे. अशास्थितीत रवी शास्त्रीऐवजी टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्यासाठी 4 दिग्गज क्रिकेटपटू मोठे दावेदार ठरू शकतात. शास्त्री 2014 मध्ये पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून भारतीय संघाशी जोडले गेले होते. त्यानंतर भारताचे माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांना एका वर्षासाठी भारताचे प्रशिक्षक बनले होते जे 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात पराभवानंतर पदावरून पायउतार झाले. यानंतर शास्त्री यांची पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. शास्त्रींच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियामध्ये दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत आणि त्यांच्याच काळात टीम इंडियाने पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
राहुल द्रविड (Rahul Dravid)
श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने राहुल द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. द्रविडच्या प्रशिक्षणात भारताने अंडर-19 2018 मध्ये विश्वचषक जिंकला. बीसीसीआयला सध्या बदल हवा आहे. संघाला पुढील स्तरावर नेण्यासाठी आणि जागतिक क्रिकेटमध्ये अजिंक्य होण्यासाठी बदल आवश्यक आहेत असे बोर्डाचे मत आहे. प्रोटोकॉलनुसार, टी-20 विश्वचषकानंतर, बीसीसीआय नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवेल. त्याने द्रविडने अर्ज केल्या ते मुख्य दावेदार ठरू शकतात.
माइक हेसन (Mike Hesson)
न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन हे जागतिक क्रिकेटमधील एक यशस्वी प्रशिक्षक आहेत. हेसनच्या प्रशिक्षणात किवी टीमने 2015 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. तसेच हेसन 2012 ते 2018 पर्यंत न्यूझीलंडचे प्रशिक्षक होते. सध्या हेसन आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे क्रिकेट संचालक आहेत.
टॉम मूडी (Tom Moody)
मूडी सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे संचालक आहेत. त्यांनी 2017 मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी मुलाखत दिली होती. मूडी यांनी प्रशिक्षक निवड प्रक्रियेत शास्त्रींना कडवी स्पर्धा देखील दिली, पण विराट कोहलीच्या निवडीची काळजी घेत शास्त्रींना प्रशिक्षक बनवण्यात आले. सध्या मूडी हे टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यासाठी मोठा दावेदार असू शकतात.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
त्याच्या निर्भीड फलंदाजीसाठी प्रसिद्ध टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग देखील प्रशिक्षक बनण्याचा दावेदार आहे. सेहवागने टीम इंडियाचे प्रशिक्षक पदासाठी यापूर्वी देखील अर्ज केला आहे. सेहवागला प्रशिक्षणाचा अनुभव नसला तरी त्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत त्यांना संधी मिळू शकते.