Ranji Trophy 2022: रणजी सामन्यापूर्वी स्पर्धेत कोरोनाची एन्ट्री, मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबेसह बंगालचे 7 खेळाडू COVID-19 संक्रमित
मुंबई आणि बंगालमधील अनेक खेळाडू आणि संघ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिवम दुबे व टीमचे व्हिडिओ विश्लेषक यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे.
Ranji Trophy 2022: 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेपूर्वी कोरोनाने दार ठोठावले आहे. मुंबई (Mumbai) आणि बंगालमधील (Bengal) अनेक खेळाडू आणि संघ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिवम दुबे (Shivam Dube) व टीमचे व्हिडिओ विश्लेषक यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. याशिवाय रणजी करंडक स्पर्धेच्या आगामी आवृत्तीपूर्वी बंगाल संघ त्यांच्या सहा खेळाडू आणि एका कर्मचारी सदस्याची कोविड-19 चाचणी सकारात्मक आल्यानंतर मोठ्या अडचणीत सापडला आहे. सुरजित यादव, सुदीप चॅटर्जी, अनुस्तूप मजुमदार, गीत पुरी, प्रदिप्ता प्रामाणिक आणि काझी जुनैद सैफी या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. तसेच सौरशीश लाहिरी, माजी क्रिकेटपटू, कोचिंग स्टाफमधील एक यांचीही RT-PCR चाचणी सकारात्मक आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात संक्रमित सदस्य सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. बंगाल 13 जानेवारी रोजी त्रिपुराविरुद्ध सामन्याने प्रथम श्रेणी स्पर्धेत त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. बंगालच्या गटात हरियाणा, केरळ, राजस्थान, त्रिपुरा आणि विदर्भ यांचाही समावेश आहे. तर पृथ्वी शॉच्या मुंबईविरुद्ध त्यांना सराव सामना खेळायचा आहे. तिथपी यानंतर मुंबईविरुद्ध CCFC स्टँडवर मंगळवारपासून होणारा त्यांचा दोन दिवसांचा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. ते दुसऱ्या सराव सामन्यात भाग घेतील की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. “सध्याच्या महामारी परिस्थिती लक्षात घेऊन, बंगाल क्रिकेट असोसिएशनने सुरक्षेचा उपाय म्हणून बंगालच्या सर्व क्रिकेटपटूंच्या RTPCR चाचण्या घेतल्या आहेत,” CAB सचिव स्नेहशिष गांगुली यांनी रविवारी संध्याकाळी एका निवेदनात सांगितले. “निकाल बाहेर आले आहेत आणि असे आढळून आले आहे की काही खेळाडूंनी सकारात्मक चाचणी आली होती. CAB या संदर्भात आवश्यक ती सर्व खबरदारी आणि कारवाई करत आहे.”
दुसरीकडे, मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबेच्या जागी मुंबईच्या 20 सदस्यीय संघात साईराज पाटीलची निवड करण्यात आली आहे. “होय, दोघांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि दुबेच्या जागी साईराज पाटीलचे नाव देण्यात आले आहे,” एका सूत्राने सोमवारी पीटीआयला सांगितले. महाराष्ट्र आणि दिल्लीविरुद्ध सामन्यांसाठी मुंबईच्या संघात दुबेला मूळ स्थान देण्यात आले होते. 41 वेळा रणजी करंडक विजेते एलिट गट सी मध्ये ठेवण्यात आले आहेत आणि त्यांचे लीग सामने कोलकातामध्ये खेळतील.