IPL Auction 2025 Live

कर्णधारपदानंतर Rahul Dravid प्रशिक्षकामध्ये 'अपयश', Team India ला मिळू शकतो T20 साठी नवा प्रशिक्षक!

असे झाल्यास, याचा अर्थ असा की भारत जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका नवा कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली खेळेल.

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) टीम इंडियामध्ये टी-20 सेटअपसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नियुक्त करण्यावर 'गांभीर्याने विचार' करत आहे. बोर्डाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय टी-20 संघासाठी नवीन कोचिंग सेटअप जानेवारीमध्येच घोषित केला जाऊ शकतो. असे झाल्यास, याचा अर्थ असा की भारत जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका नवा कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली खेळेल. इनसाइड स्पोर्टस ने यापूर्वी वृत्त दिले होते की भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेपूर्वी हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) अधिकृतपणे टीम इंडियाचा नवीन टी-20 कर्णधार म्हणून नियुक्त केले जाईल. आता बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला पुष्टी केली आहे की बोर्ड भारतीय टी-20 संघासाठी नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्यात इच्छुक आहे.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती

राहुल द्रविड प्रामुख्याने एकदिवसीय आणि कसोटी संघांवर लक्ष केंद्रित करेल, तर टी-20 साठी वेगळ्या कोचिंग सेटअपचा विचार केला जात आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत. राहुल द्रविड किंवा कोणाच्याही क्षमतेपेक्षा व्यस्त वेळापत्रक सांभाळणे आणि तज्ञ असणे हा प्रश्न आहे. टी-20 आता एक वेगळा खेळ, कठीण कॅलेंडर आणि नियमित कार्यक्रमांसारखे आहे. आपणही बदल करायला हवेत. होय, मी पुष्टी करू शकतो की भारतात लवकरच नवीन टी-20 कोचिंग सेटअप स्थापन होईल. (हे देखील वाचा: IND vs BAN ODI 2022: पहिल्या वनडे पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का, आयसीसीने केली ही कारवाई)

टी-20 विश्वचषकासाठी भारताचे मिशन जानेवारीपासुन

याआधी रवी शास्त्री आणि हरभजन सिंह यांनीही टीम इंडियासाठी टी-20 सेटअपमध्ये वेगळे प्रशिक्षक आणि कर्णधार ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारताचे मिशन जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने सुरू होईल. अशा परिस्थितीत मोठे बदल केले जाऊ शकतात आणि सर्वात मोठा बदल हा असू शकतो की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना भारताच्या टी-20 सेटअपच्या योजनेत समाविष्ट केले जाऊ शकत नाही.

वरिष्ठ खेळांडूना मिळणार डिच्चू

भारत जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक या सीनियर खेळाडूंना या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. भारताचा उपकर्णधार केएल राहुलही या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. लग्नासाठी त्याने बीसीसीआयकडून जानेवारी महिन्यात रजा घेतली होती, तीही मंजूर झाली असल्याचे बोलले जात आहे.