Asia Cup 2022: विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी लाहोरहून थेट यूएईला पोहचला पाकिस्तानी जबरा फॅन, व्हिडिओ व्हायरल
यानंतर चाहत्याने मोठा आवाज केला आणि विराट स्वत: फोटोसाठी पोहोचला.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) भारतातच नाही तर परदेशातही जबरदस्त चाहते आहे. अनेक क्रिकेट चाहते विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक किलोमीटर दूर जातात. अनेक वेळा सामन्यादरम्यानही विराटला भेटण्यासाठी चाहते मैदानात दाखल झाले आहेत. आता आशिया चषकापूर्वीही असेच एक दृश्य पाहायला मिळाले आहे. आशिया चषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ (Team India) दुबईत (Dubai) पोहोचला असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू मेहनत घेत आहेत. दरम्यान, विराटचा एक चाहता चर्चेत आला आहे. कोहलीसोबत सेल्फी काढण्यासाठी या चाहत्याची गार्डशी झटापट झाली, मात्र गार्डने त्याला विराटपर्यंत पोहोचू दिले नाही. यानंतर चाहत्याने मोठा आवाज केला आणि विराट स्वत: फोटोसाठी पोहोचला.
काय आहे प्रकरण?
सराव सत्रादरम्यान विराट कोहली हॉटेलसाठी मैदानातून जात होता. यादरम्यान एक चाहता त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी जाऊ लागला तेव्हा गार्डने त्याला अडवले. त्यानंतर चाहत्याने मोठा आवाज करत सांगितले की तो बाबर आझमच्या शहराचा आहे आणि विराटसोबत फोटो काढण्यासाठीच इथपर्यंत आला आहे. हे ऐकून विराट परतला आणि आला आणि त्याने चाहत्यासोबत फोटो काढला. (हे देखील वाचा: Asia Cup मध्ये PAK विरुद्धच्या सामन्यापूर्वी Team India चे नव्या जर्सीत फोटोशूट (Watch Video)
विराटसाठी पाकिस्तानहून यूएईला पोहचला
माहितीनुसार, मोहम्मद जिब्रान असं त्या चाहत्याचं नाव आहे. तो पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून विराट कोहलीची खूप मोठा चाहता आहे. विराट कोहलीसोबत घेण्यासाठी त्यानं दीर्घकाळ प्रतिक्षा केलीय. मोहम्मद जिब्रान म्हणतो की, "भारताचा माजी कर्णधार विराट कोहली एक अद्भुत व्यक्ती आहे. माझे म्हणणं ऐकून त्यानं सेल्फी घेण्यास होकार दिला. विराट कोहली लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतावा, अशी प्रार्थना करतो." मोहम्मद जिब्रान पुढं म्हणाले की, "मी आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूसोबत सेल्फी घेतलेला नाही. मात्र, विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्याची इच्छा खूप जुनी होती"