IPL Auction 2025 Live

Pak VS Ban Karachi Test: पाकिस्तान आणि बांगलादेशमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश नाही; तिकीटांचे पैसे परत मिळणार

पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जात असल्यानं मैदानांची देखील दुरुस्ती केली जात आहे.

पाकिस्तान 1996 नंतर एखाद्या आयसीसी स्पर्धेचं संयोजन करणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बांगलादेश आणि इंग्लंड पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वांच्या समोर त्यांनी स्वत:चे हसू करून घेतले आहे.  कराचीतील मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, निर्णयापूर्वीच तिकीट विक्री सुरु झाली होती. ज्यांनी तिकीटं खरेदी केली होती त्यांना पैसे परत दिले जाणार असल्याची माहिती आहे.  (हेही वाचा - PAK vs BAN, Ticket Prize: बांगलादेश - पाकिस्तानच्या सामन्याच्या तिकिटाची किंमत पाहून सर्वच हैराण; वडापाव पेक्षा कमी पैशात पाहता येणार सामना)

पाकिस्तानमध्ये एकतर क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षक मिळत नसताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामन्यात प्रेक्षकांना नो एंट्री सांगितले आहे. पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जात असल्यानं मैदानांची देखील दुरुस्ती केली जात आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमची देखील दुरुस्ती केली जात आहे. कराचीतील स्टेडियममध्ये बांधकाम आणि दुरुस्तीची कामं सुरु असल्यानं 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे पीसीबीने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं कराचीत होणाऱ्या बांगलादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी सुरु असलेली तिकीट विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीनं तात्काळ तिकीट विक्री थांबवली आहे. ज्या प्रेक्षकांनी पहिल्यांदा तिकीटं खरेदी केली असतील त्यांना तिकिटांची रक्कम परत दिली जाणार आहे. यामुळं प्रेक्षकांना होणाऱ्या त्रासासाठी खेद व्यक्त करतो, असं देखील पीसीबीकडून सांगण्यात आलंय.