On This Day: आजच्या दिवशी सौरव गांगुली-राहुल द्रविड यांनी वर्ल्ड कप सामन्यात नोंदवली त्रिशतकी भागीदारी, दोघांनी झळकावले तुफानी शतक

गांगुली-द्रविडने दुसऱ्या विकेटसाठी त्यावेळी सर्वाधिक 318 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी तुफान शतक ठोकले.

राहुल द्रविड-सौरव गांगुली (Photo Credit: Getty)

1999 वर्ल्ड कप (World Cup) इंग्लंडच्या भूमीवर खेळला गेला. आजच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी भारतीय संघाचे फलंदाज सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रम नोंदविला. 2015 च्या वर्ल्ड कप सामन्यात हा विक्रम मोडला गेला असला तरी त्या दिवशी सौरव आणि राहुलने खेळलेल्या चकित करणाऱ्या खेळीने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि आजही तो डाव सर्वांच्या स्मरणी राहिलेला आहे. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात टीम इंडियाने लीगच्या टप्प्यात दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध असे दोन सामने गमावले. तिसऱ्या आणि करो-या-मरोच्या सामन्यात भारतासमोर त्यावेळचा मजबूत संघ श्रीलंकेचे (Sri Lanka) आवाहन होते. 26 मे 1999 रोजी भारत-श्रीलंकामध्ये हा सामना खेळला गेला. सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगा याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. (दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2000 मुंबई टेस्ट, कोचीन वनडे सामने फिक्स, दिल्ली पोलिसांचा चकित करणारा खुलासा)

श्रीलंकेने चांगली सुरुवात केली आणि भारताला 6 धावांवर पहिला झटका दिला. संदगोपन रमेश 5 धावांवर बाद झाला. पण यानंतर गांगुली आणि द्रविड क्रीजवर विश्वविक्रमी कामगिरी बजावली. दोघांनी प्रथम 50 धावा, 100, 150, 200, 250 आणि 300 अधिक धावांची विक्रमी भागीदारी केली. गांगुली-द्रविडने दुसऱ्या विकेटसाठी त्यावेळी सर्वाधिक 318 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी तुफान शतक ठोकले. गांगुलीने 17 चौकार आणि 7 षटकारांसह 183, तर द्रविडने 145 धावा केल्या ज्यात 17 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. दोन्ही फलंदाजांच्या शतकी डावाच्या जोरावर भारताने 373/6 धावांचा स्कोर उभारला. प्रत्युत्तरात श्रीलंकेला 216 धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताने सहज सामना जिंकला.

भारताने 157 धावांनी सामना जिंकला. भारताकडून रॉबिन सिंहने 5 गडी बाद केले. द्रविड आणि गांगुलीमधील ही भागीदारी क्रिकेटमधील इतिहासातील चौथी सर्वात मोठी भागीदारी आहे. 1999 विश्वचषकात भारत वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला.