On This Day in 2019: विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथसाठी वर्ल्ड कपमध्ये दाखवलेल्या खेळाडूवृत्तीने जिंकली फॅन्सची मनं, ICC नेही केला गौरव (Watch Video)

हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला आवडला नाही. त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे तर त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगितले आणि या प्रकारासाठी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीदेखील मागितली.

विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: VideoScreenGrab/YouTube)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर त्याच्या आक्रमक वागणुकीसाठी ओळखला जातो. यामुळे त्याच्यावर अनेकदा टीकाही करण्यात आली होती, असे असतानाही कोहलीने वेळोवेळी खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहेत. 9 जून, 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) वर्ल्ड कप (World Cup) सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार कोहलीला आवडला नाही. त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे तर त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगितले आणि या प्रकारासाठी प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीदेखील मागितली. कोहलीच्या या कृतीने सर्वांचीच मनं जिकली. आणि काही महिन्यानंतर त्याचा 'त्या' कृत्याबद्दल ICC कडून गौरव करण्यात आला. कोहलीला 2019 ICC Spirit of Cricket पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (विराट कोहली याचे 'या' एका गोष्टीसाठी स्टिव्ह स्मिथ करतो कौतुक, टीम इंडिया कर्णधाराच्या तुलनेवर पाहा काय म्हणाला वर्ल्ड नंबर-1 फलंदाज)

भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सामन्यात स्मिथ वॉक्सल एंडच्या सीमारेषेकडे फिल्डिंग करत होता. जेथे स्टॅन्डमध्ये उपस्थित भारतीय प्रेक्षकांनी 'चीटर' म्हणून स्मिथची हुर्यो उडवली. कोहलीला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्याने तत्काळ प्रेक्षकांकडे पाहून स्मिथची हुटींग करू नये असे आवाहन केले आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. विराटच्या 'त्या' कृत्याचे स्मिथने कौतुक केले. स्मिथने त्याच्याकडे येऊन त्याच्या पाठीवर थाप दिली आणि ड्रिंक ब्रेक दरम्यान हॅन्डशेक केला. भारतीय कर्णधारांच्या या हृदयस्पर्शी कृतीने सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकली आणि आयसीसीच्या 2019 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' पुरस्काराचा मानकरी ठरला.

पाहा विराटच्या हृदयस्पर्शी कृतीचा हा व्हिडिओ:

दरम्यान, सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेतही कोहलीला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर कोहली म्हणाला होता की जे घडलंय त्याला (बॉल टॅम्परिंग प्रकरण) खूप कालावधी झाला आहे. आता स्मिथ मैदानात परतला आहे. एखाद्याचे असे खच्चीकरण करणे योग्य नाही.