6 षटकारांच्या 12 वर्षांनंतर युवराज सिंह याने काढली ऐतिहासिक मॅचची आठवण, शेअर केला 'हा' सुंदर Throwback Photo

आजच्या खास क्षणाची आठवण काढत 'सिक्सर किंग' ने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये युवराजने लिहिले की त्याला आपण असे काही करू याची अपेक्षा नव्हती पण याची तयारी त्याने खूप काळ आधीच केली.

युवराज सिंह (Photo Credit: PTI)

19 सप्टेंबर 2007  या दिवसाची इतिहासात नोंद केली गेली आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 विश्वचषकच्या मॅचमध्ये युवराज सिंह (Yuvraj Singh) याने स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते. यादरम्यान, केवळ 12 चेंडूंचा सामना करत युवराजने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने (India) इंग्लंडसमोर 218 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल लक्ष्यचा पाठलागा करणाऱ्या इंग्लंड (England) संघ निर्धारित ओव्हरमध्ये सहा गडी गमावून 200 धावा करू शकला. अशा प्रकारे, भारतीय संघाने युवराजच्या शानदार कामगिरीमुळे हा सामना 18 धावांनी रोखला होता. आजच्या खास क्षणाची आठवण काढत 'सिक्सर किंग' ने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये युवराजने लिहिले की त्याला आपण असे काही करू याची अपेक्षा नव्हती पण याची तयारी त्याने खूप काळ आधीच केली. (12 वर्षांपूर्वी जेव्हा युवराज सिंह च्या 6 षटकारांनी हादरले होते डरबन मैदान, आजही कायम आहे 'तो' विक्रम Video)

फोटो शेअर करत युवराजने कॅप्शन देत लिहिले की, "12 वर्ष! मी कधीही सलग 6 षटकार मारू असा विचारही केला नाही. पण, खूप लवकर सराव सुरू केला 🏏 #विशेषस्मृती. 666666 ☝🏼" युवराजने 12 वर्षांपूर्वी 2007 च्या टी-20 विश्वचषकमध्ये आपला ऐतिहासिक डाव खेळला होता, परंतु त्याचे चाहते अजूनही हा डाव आवर्जून पाहतात. युवराजच्या या रेकॉर्ड खेळीच्या जोरावर भारताने फायनलमध्ये स्थान मिळवले आणि 24 सप्टेंबर 2007 रोजी झालेल्या अंतिम मॅचमध्ये पाकिस्तानला पराभूत करून भारताने चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.

युवीने 16 चेंडूत 58 धावा केल्या यात त्याने 7 षटकार आणि 3 चौकार लगावले. 2011 च्या विश्वचषकातही युवराजने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याला 'मॅन ऑफ द सीरिज' चा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी तो कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराशी झुंज देत होता, परंतु तरीही त्याने धैर्य गमावले नाही आणि त्याने बॉल आणि बॅट या दोन्हीने संघाच्या विजयात हातभार लावला. मात्र, अनेक वर्ष क्रिकेटमधून बाहेर राहिल्यानंतर युवराजने यावर्षी खेळातून निवृत्ती जाहीर केली.