भारतीय संघाच्या बॅटिंग प्रशिक्षकपदासाठी मुंबई रणजी संघाचे कोच प्रवीण अमरे यांचा अर्ज

विश्वचषकमधील संघाच्या अपयशानंतर सध्याचे बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर यांच्या कामगिरीवर बीसीसीआयने नाराजी प्रकट केली होती.

प्रवीण अमरे आणि भारतीय संघ (Images credit: Instagram and Getty)

टीम इंडियाच्या (Indian Team) आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यानंतर संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ मिळणार आहे. विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने (BCCI) संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले होते. क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू जाँटी ऱ्होड्स (Jonty Rhodes) यांनी अर्ज केला आहे. तर इंडिया टुडेच्या वृत्तानुसार भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे (Pravin Amre) यांनी संघाच्या फलंदाजी पदासाठी अर्ज केला आहे. विश्वचषक आणि त्याआधी न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध मालिकेदरम्यान संघाच्या अपयशानंतर सध्याचे बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Banger) यांच्या कामगिरीवर बीसीसीआयने नाराजी प्रकट केली होती. (भारताचे माजी खेळाडू रॉबिन सिंह यांचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज; रवी शास्त्रींवर साधला निशाणा)

ऑगस्ट 2014 पासून बांगर हे भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक आहे. शिवाय त्यांनी काही काळी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देखील पार पाडली होती. जुलै 2016 मध्ये अनिल कुंबळे (Anil Kumble) यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर बांगरकडे पुन्हा फलंदाज प्रशिक्षकपद गेले होते. आणि त्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या मार्गदर्शनाखाली देखील बांगर यांच्याकडे हेच पद कायम होते. पण, इतकी वर्ष फलंदाज प्रशिक्षक असूनही बांगर यांना संघात चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज शोधता आला नाही. त्यामुळे त्यांचे पद धोख्यात आले आहे. अमरे यांनी मुंबई रणजी संघ, पुणे वॉरियर्स इंडिया (Pune Warriors India) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे प्रशिक्षकपदही भूषविले आहे. ते सध्या त्यांची युएसए (USA) क्रिकेट संघाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतासाठी आम्रेंनी 11 टेस्ट आणि 37 वनडे सामने खेळले आहेत. टेस्ट पदार्पणात त्यांनी दक्षिण आफ्रिकेत 103 धावांची दमदार खेळी केली होती. त्यांनी 2012 च्या भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचे देखील मार्गदर्शन केले होते.