Mumbai Indians IPL 2021 Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचा टॉप-4 मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खडतर, प्लेऑफ गाठण्यासाठी लावावा लागणार पूर्ण जोर
मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानावर पोहचले नाही, तर त्यांचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्गही खूप कठीण झाला आहे. त्यामुळे पाच आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स संघ आता अंतिम चार संघात कसा प्रवेश मिळवू शकतो याबाबत जाणून घेणार आहोत.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात झालेल्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. यंदाच्या आयपीएल प्ले ऑफमध्ये (IPL Playoffs) पोहचण्यासाठी संघात रोमांचक लढत सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर केकेआरने (KKR) टॉप 4 मध्ये प्रवेश केला आहे. तर मुंबई इंडियन्स केवळ सहाव्या स्थानावर पोहचले नाही, तर त्यांचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्गही खूप कठीण झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स पूर्वीप्रमाणे अव्वल स्थानावर विराजमान आहे. गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सविरुद्ध दणका नोंदवला. केकेआरचा आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमधील हा चौथा विजय होता. केकेआर 8 गुण आणि +0.363 च्या नेट रन रेटसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने 9 पैकी चार सामने जिंकले आहेत पण -0.310 नेट रन रेटमुळे ते सहाव्या स्थानावर घसरले आहेत. त्यामुळे पाच आयपीएल (IPL) विजेते मुंबई इंडियन्स संघ आता अंतिम चार संघात कसा प्रवेश मिळवू शकतो याबाबत जाणून घेणार आहोत. (IPL 2021: केकेआरविरुद्धच्या सामन्यात आमच्याकडून चुका झाल्या, रोहित शर्माने दिली प्रतिक्रिया)
मुंबई इंडियन्सचा सामना आता दिल्ली कॅपिटल्स (DC), राजस्थान रॉयल्स (RR), सनरायझर्स हैदराबाद (SRH), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्याशी होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सची प्लेऑफच्या शर्यतीत स्थिती प्रत्येक सामन्यानंतर कठीण होत आहे. पहिले सीएसके आणि आता आता केकेआरच्या हातून झालेल्या पराभवामुळे रोहित शर्माच्या पलटनसाठी रस्ता अधिक खडतर बनला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्सची आता आयपीएल गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. ‘हिटमॅन’च्या नेतृत्वातील संघाला आता अत्यंत काळजीपूर्वक पुढे खेळावे लागेल. प्लेऑफ फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना 5 पैकी 4 सामने जिंकणे आवश्यक आहे. तसेच अन्य संघाच्या खेळांवरही मुंबई इंडियन्सचे नशीब अवलंबून असेल.
दुसरीकडे, आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. धोनीचा CSK दुसऱ्या स्थानावर कायम आहे. CSK ने आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि त्यांचे 12 गुण आहेत. तसेच आरसीबी 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे मुंबईपेक्षा त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स पूर्वीप्रमाणे अनुक्रमे सातव्या-आठव्या स्थानावर आहेत.