MI vs DC, IPL 2020: MI विरुद्ध शिखर धवनचा नाबाद अर्धशतकी डाव; रोहित शर्मा, विराट कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी
धवनने मुंबईविरुद्ध 52 चेंडूंत नाबाद 69 धावांची खेळी केली. धवनचे हे 38वे अर्धशतक होते आणि यासह त्याने रोहित शर्मा, सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या तिघांनीही आयपीएलमध्ये 38 अर्धशतकं केली आहेत.
Most 50s in IPL History: दिल्ली कॅपिटलचा (Delhi Capitals) सलामीवीर फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL) 27व्या सामन्यात यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने केवळ अर्धशतकी खेळीच केली नाही तर संघाला 162 धावांवर नेण्यातही मोठी भूमिका बजावली. धवनने मुंबईविरुद्ध 52 चेंडूंत नाबाद 69 धावांची खेळी केली. या डावात 'गब्बर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखरने एक षटकार आणि 8 चौकार ठोकले. मुंबईच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आक्रमणासमोर असा डाव खेळणे सोपे नव्हते, परंतु गब्बरने फलंदाजीसह आपले अप्रतिम योगदान दिले आणि संघात आपले योगदान दिले. आयपीएलमध्ये धवनचे हे 38वे अर्धशतक होते आणि यासह त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma), सुरेश रैना (Suresh Raina) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या तिघांनीही आयपीएलमध्ये 38 अर्धशतकं केली आहेत. (MI vs DC, IPL 2020: क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकाने मुंबई इंडियन्स टॉप वर, दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेटने मिळवला एकतर्फी विजय)
पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेच्या रुपात दिल्लीने त्यांची दोन मोठ्या विकेट गमावली. परंतु धवन एकाबाजूने सावध खेळ करत राहिला आणि तिसर्या विकेटसाठी कर्णधार श्रेयस अय्यरबरोबर 85 धावांची चांगली भागीदारी केली. श्रेयस 42 धावांवर बाद झाला असून धवन अखेरपर्यंत नाबाद राहिला. या दरम्यान धवनने अर्धशतक ठोकले आणि सर्वाधिक आयपीएल अर्धशतकांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. दरम्यान, सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर 46 अर्धशतकांसह अव्वल स्थानी आहे. या यादीत 36 अर्धशतकांसह कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, धवनचे अर्धशतक व्यर्थ गेले कारण मुंबईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 5 विकेटने विजय एकतर्फी मिळवला. मुंबईच्या अनुभवी फलंदाजीसमोर दिल्लीचे गोलंदाज निरुत्तर दिसले. कॅपिटल्सने दिलेल्या 163 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने सलामी फलंदाजीने क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज विजय नोंदवला आणि आयपीएल गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा विजय ठरला. दुसरीकडे, दिल्लीला सलग तीन सामन्यात विजय मिळवल्यावर पहिल्या, तर स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.