Legends League Cricket 2022: या वर्षी लिजंड लीग मधून सचिन तेंडुलकर आऊट; अमिताभ बच्चन यांनी ‘हे’ ट्विट करून मागितली माफी; पहा काय आहे नक्की प्रकरण

अलीकडेच रिलीज केलेल्या लीगच्या जाहिरातीत भारतीय संघ, इंडिया महाराजा, ची घोषणा करण्यात आली होती आणि तेंडुलकर संघाचा एक भाग असेल असे दर्शविण्यात आले.

सचिन तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 20 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आगामी लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) खेळणार नसल्याचे त्याच्या व्यवस्थापकीय फर्म, SRT स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने शनिवारी सांगितले. लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये निवृत्त खेळाडू आणि 3 संघ यजमान असतील. मस्कत, ओमान येथे खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेसाठी त्यांनी नुकताच भारतीय संघ जाहीर केला. भारताचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे LLC चे आयुक्त आहेत. यावेळी युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), हरभजन सिंह, इरफान आणि युसूफ पठाण यांचाही भारतीय संघात समावेश असेल. अलीकडेच रिलीज करण्यात आलेल्या एका ट्विटर व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये बॉलीवूडचे महानायक अभिनेता अमिताभ (Amitabh Bachchan) बच्चन होते, भारतीय संघ, इंडिया महाराजा, ची घोषणा करण्यात आली होती आणि तेंडुलकर संघाचा एक भाग असेल असे दर्शविण्यात आले होते.

बच्चन यांनी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या एका जाहिरातीत काम केले होते, ज्यामध्ये ते सांगतात की कोणते दिग्गज लीजंड लीग क्रिकेटमध्ये सामील होत आहेत. यामध्ये तो अगदी सुरुवातीला सचिन तेंडुलकरचे नाव घेतात. हा व्हिडिओ पुन्हा शेअर करताना सचिनची कंपनी 100MB कडून सचिन या लीगमध्ये खेळत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. “सचिन तेंडुलकर 'लिजेंड्स लीग क्रिकेट'मध्ये सहभागी झाल्याची बातमी खरी नाही. आयोजकांनी क्रिकेट चाहत्यांची आणि अमिताभ बच्चन यांची दिशाभूल करण्यापासून परावृत्त केले पाहिजे,” एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकृत प्रवक्त्याने ट्विटर पोस्टमध्ये सांगितले. यानंतर अमिताभ यांनी नवीन ट्विट करून माफी मागितली आणि लीगचा नवीन सुधारित व्हिडिओही शेअर केला.

अमिताभ बच्चन

दरम्यान या स्पर्धेत भारतीय संघाव्यतिरिक्त आणखी दोन संघ असतील. हे संघ रेस्ट ऑफ द वर्ल्ड आणि आशिया लायन्स असतील. आशियाई संघात पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे खेळाडू एकत्र खेळतील. यामध्ये मिसबाह-उल-हक, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल, शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास, रोमेश कालुवितरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, आणि सगर अफगान यांचा समावेश आहे. 20 जानेवारीपासून LLC ची सुरुवात होत आहे.