KXIP vs RCB, IPL 2020: किंग्स इलेव्हनची 'बल्ले-बल्ले'! फिरकी गोलंदाजीसमोर RCB फलंदाजांचे लोटांगण, पंजाब 97 धावांनी विजयी

किंग्स इलेव्हनने पहिले फलंदाजी करून बेंगलोरला विजयासाठी 207 धावांचे विशाल आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात विराट सेनेला 109 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि ऑलआऊट झाली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यातील दुबई येथे झालेल्या आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीला (RCB) 97 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. किंग्स इलेव्हनने पहिले फलंदाजी करून बेंगलोरला विजयासाठी 207 धावांचे विशाल आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात विराट सेनेला 109 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि ऑलआऊट झाली. पंजाबने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येच्या प्रत्युत्तरात आरसीबी फलंदाजांनी केएल राहुलच्या (KL Rahul) पंजाबच्या गोलंदाजीसमोर अक्षरशः लोटांगण घातले. आरसीबीचा एकही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. एबी डिव्हिलियर्सने 28, वॉशिंग्टन सुंदर 24 आणि आरोन फिंचने 20 धावा केल्या. पंजाबकडून रवी बिश्नोईने आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी 3, शेल्डन कॉटरेलने 2 आणि मोहम्मद शमी, ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (KXIP vs RCB, IPL 2020: विराट कोहलीने सोडले केएल राहुलचे सलग दोन कॅच; निराश नेटकरी RCB कर्णधारावर भडकले See Tweets)

बेंगलोरकडून आरोन फिंच आणि देवदत्त पड्डीकल यांनी डावाची सुरुवात केली. पण बेंगलोरची सुरुवात चांगली झाली नाही. पड्डीकल एक धाव करून बाद झाला. त्यानंतर बेंगलोरच्या विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. जोश फिलिप शून्य, विराट कोहली 1 धाव करून स्वस्तात बाद झाले. फिंचने डिव्हिलियर्सच्या साथीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण दोघे अपयशी ठरले. युवा बिश्नोईने फिंचला बोल्ट करून आरसीबीला मोठा धक्का दिला. फिंच पाठोपाठ पुढील ओव्हरमध्ये डिव्हिलियर्स देखील माघारी परतला. शिवम दुबेही मोठा डाव खेळू शकला नाही. त्याने 12 धावा केल्या. उमेश यादव शून्य, नवदीप सैनीने 6 धावा केल्या.

यापूर्वी, पंजाबने पहिले फलंदाजी केली. कर्णधार केएल राहुलने दमदार शतकी डाव खेळला. राहुलने सर्वाधिक 132 धावा केल्या आणि नाबाद परतला. राहुलने 62 चेंडूत शतक पूर्ण केले. राहुलचे आयपीएलमधूला दुसरे शतक होते. आयपीएलच्या 13व्या हंगामातील हे पहिले शतक ठरले.पंजाबच्या मागील सामन्यात अर्धशतक झळकावणारा मयंक अग्रवाल आज 26 धावांवर बाद झाला, निकोलस पूरनने 17 धावा केल्या. आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार राहुलने आयपीएलमधील 17 वे अर्धशतक झळकावले आहे. यासोबतच राहुलने आपल्या आयपीएल करिअरमधील 2000 धावा पुर्ण केल्या आहेत.