IPL 2026 Toss Controversy: मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर सामन्यात टॉसवरून वाद; सोशल मीडियावर 'टॉस फिक्सिंग'चे आरोप

आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात नाणेफेकीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कॅमेरा अँगल अचानक बदलल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी 'टॉस फिक्सिंग'चे आरोप केले असून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Toss in MI vs KKR IPL 2026 match (Photo X@IPL)

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात झालेल्या सामन्यात नाणेफेकीच्या (Toss) प्रक्रियेवरून चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाणेफेकीच्या वेळी कॅमेरा अँगल अचानक बदलल्याने आणि नाण्याचा निकाल स्पष्ट न दिसल्याने सोशल मीडियावर 'टॉस फिक्सिंग'चे आरोप केले जात आहेत.

नक्की काय घडलं?

सामन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या, केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सामनाधिकारी नाणेफेकीसाठी मैदानात आले होते. हार्दिकने नाणे हवेत उडवले आणि रहाणेने 'टेल्स' (Tails) असा कॉल दिला. मात्र, नाणे जमिनीवर पडताच ब्रॉडकास्टरने कॅमेरा नाण्यावरून हटवून दुसरीकडे वळवला. नाणे नेमके कोणत्या बाजूने पडले, हे टीव्ही किंवा डिजिटल स्क्रीनवर पाहणाऱ्या चाहत्यांना दिसले नाही. काही सेकंदातच सामनाधिकाऱ्यांनी मुंबईने टॉस जिंकल्याचे घोषित केले.

चाहत्यांचा सोशल मीडियावर संताप

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. "असे नेहमी मुंबई इंडियन्सच्या सामन्यातच का घडते?" असा सवाल अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. चाहत्यांच्या मते, महत्त्वाच्या क्षणी कॅमेरा अँगल बदलणे हे संशयास्पद आहे. अनेकांनी याला 'लाईव्ह फिक्सिंग' असे संबोधले असून आयपीएलच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

खेळपट्टीवरून रहाणेचा आश्चर्य

टॉस गमावल्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने वानखेडेच्या खेळपट्टीबाबत (Pitch) आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला की, वानखेडेवर एवढे गवत त्याने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. सरावासाठी दिलेल्या खेळपट्ट्या आणि प्रत्यक्ष सामन्याची खेळपट्टी यात मोठी तफावत असल्याचेही त्याने नमूद केले. रहाणेने स्पष्ट केले की, जर त्याने टॉस जिंकला असता, तर त्यानेही प्रथम गोलंदाजीचाच निर्णय घेतला असता.

या वादामुळे आयपीएलमधील नाणेफेकीच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. खेळाच्या अखंडतेसाठी ब्रॉडकास्टर्सनी नाणेफेकीचे स्पष्ट आणि अखंडित चित्रण दाखवणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबई इंडियन्सने हा सामना ऐतिहासिक धावांचा पाठलाग करून जिंकला असला, तरी मैदानाबाहेरील या वादामुळे विजयाची चर्चा काहीशी मागे पडली आहे. बीसीसीआय किंवा आयपीएल प्रशासनाने अद्याप या वादावर अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement