IPL Auction 2025 Live

Prithvi Shaw ‘या’ आजाराच्या विळख्यात, राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार ऋषभ पंतने दिल्लीच्या सलामीवीराच्या तब्येतीची दिली माहिती

सामन्यानंतर पंत म्हणाला की शॉला टायफॉइड झालं असल्याचे डॉक्टरांनी त्याला सांगितले.

पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/IPL)

आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएल 2022 मधील त्यांचा सहावा सामना जिंकला परंतु कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) सांगितले की सेटअपमध्ये त्याला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची उणीव भासली. बुधवारी, मिचेल मार्शची अष्टपैलू खेळी आणि डेविड वॉर्नरच्या कुशल अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 8 गडी राखून पराभव केला. मार्शने 25 धावांत 2 बळी घेतल्या आणि 62 चेंडूंत 89 धावा केल्या तर वॉर्नर 52 धावांवर नाबाद राहिला. यासह दिल्लीने 11 चेंडू शिल्लक असताना 161 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. पण ऋषभ पंत म्हणाला की, पृथ्वीच्या अनुपस्थितीमुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. (IPL 2022, RR vs DC: वॉर्नर-मार्शपुढे राजस्थान निष्प्रभ; दिल्लीकडून राजस्थानचा 8 विकेटने दारुण पराभव, PlayOff मधील आव्हान कायम)

पृथ्वी शॉ 1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात या मोसमात DC कडून शेवटची मॅच खेळली होती. त्याच्या जागी आलेला श्रीकर भारत बुधवारी RR विरुद्ध शून्यावर बाद झाला पण मार्श-वॉर्नरच्या भागीदारीमुळे दिल्लीने विजयीरेष ओलांडली. “आम्हाला त्याची आठवण येते पण आम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याला टायफॉइड आहे किंवा असे काहीतरी डॉक्टरांनी मला सांगितले,” पंतने सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सला सांगितले. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या शानदार विजयानंतर प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान कायम ठेवले आहे. दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या मोहिमेत विसंगत आहेत, ज्यात शिबिरातील काही कोविड -19 प्रकरणांचा देखील समावेश आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागण्याच्या काही दिवस आधी, वॉर्नरच्या नाबाद 92 धावा आणि रोव्हमन पॉवेलच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचे ग्रुप स्टेजमध्ये आणखी दोन सामने शिल्लक आहेत आणि ते आता जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंत मजल मारू शकतात. दिल्लीच्या पुढे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 12 सामन्यांतून 14 गुणांसह आघाडीवर आहेत. दिल्ली कॅपिटल्सची पुढील लढत 16 मे रोजी पंजाब किंग्जशी होणार आहे आणि त्यांचा गट टप्प्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 21 मे रोजी अंतिम सामना खेळतील. मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.