IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: प्लेऑफमध्ये ‘रनमशीन’ ठरलेल्या ‘या’ स्टार फलंदाजाला CSK ने बेंचवर बसवले, दिल्लीविरुद्ध संघाला चूक भोवणार?
धोनीचे सुपर किंग्स त्यांचा स्टार फलंदाज सुरेश रैना विना मैदानात उतरणार आहे. आयपीएल फायनलचे तिकिट दाववर असताना धोनी आणि सीएसके संघ व्यवस्थापनाने रैनाला पुन्हा एकदा बाहेर बसावण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन प्रीमीयर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये रविवारी पहिला क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या गुणतालिकेतील अव्वल दोन संघात होत आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात चेन्नई कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून दिल्ली बॉईजला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. पंतने दिल्लीच्या ताफ्यात एक बदल करून रिपल पटेलच्या जागी टॉम कुरनला संधी दिली आहे. तर धोनीचे सुपर किंग्स त्यांचा स्टार फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) विना मैदानात उतरणार आहे. आयपीएल फायनलचे (IPL Final) तिकिट दाववर असताना धोनी आणि सीएसके (CSK) संघ व्यवस्थापनाने रैनाला पुन्हा एकदा बाहेर बसावण्याचा निर्णय घेतला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रैनाला चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते आणि प्लेऑफमध्ये आतापर्यंत प्रभावी आकडेवारी असूनही त्याला पहिला क्वालिफरसाठी चेन्नई इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. (IPL 2021, DC vs CSK Qualifier 1: दिल्लीविरुद्ध MS Dhoni ने जिंकला टॉस, दिल्लीला दिले फलंदाजीचे आंमत्रण; धोनी ‘ब्रिगेड’मधून स्टार खेळाडूला डच्चू)
प्लेऑफ सामन्यात सुरेश रैनाची आकडेवारी उत्कृष्ट राहिली आहे आणि प्लेऑफ सामन्यांमध्ये तो आतापर्यंत या लीगमध्ये CSK साठी ‘रनमशीन’ ठरला आहे. रैना एक मॅच विनर आहे आणि त्याला या मोठ्या सामन्यांमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. तो सीएसकेसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यामुळे आता रैनाला बेंचवर बसवण्याची चूक चेन्नईला या महत्वपूर्ण सामन्यात भोवणार का हे पाहावे लागेल. तसेच, प्लेऑफची आकडेवारी रैनाच्या बाजूने आहे, जो या लीगमधील प्लेऑफमध्ये कोणत्याही संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मधल्या फळीतील अनुभवी फलंदाजाने आयपीएलमधील पहिल्या क्वालिफायरमध्ये 208 धावा केल्या आहेत आणि पहिल्या क्वालिफायरमध्ये 200 पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
जेव्हा प्लेऑफच्या एकूण कामगिरीचा विचार केला जातो, सुरेश रैना तिथेच आहे आणि तो बाद फेरीतील एक अत्यंत कुशल फलंदाज आहे. त्याने 24 सामन्यांत 37.57 च्या सरासरीने 714 धावा केल्या आहेत आणि 155.2 च्या स्ट्राईक रेटच्या खेळीत सात अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय आयपीएल प्लेऑफ आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा वगळता, रैनाने अधिक चौकार (51), सर्वाधिक षटकार (40) खेचले आहेत. तसेच सर्वात वेगवान अर्धशतकाचा (फक्त 16 चेंडूंत) विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. रैनाच्या आयपीएल कारकीर्दबद्दल बोलायचे तर त्याने 205 सामन्यांमध्ये 5528 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आहे आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 100 आहे.