IPL 2021 Phase-2: आयपीएलच्या दुसरा टप्प्याचा रणसंग्राम 19 सप्टेंबरपासून, पहिल्या दिवशी 'या' दोन संघात होणार भिडत
त्याअंतर्गत चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यासह स्पर्धा पुन्हा सुरू होईल. हा सामना दुबईमध्ये खेळला जाईल. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी तारखांची पुष्टी केली. 29 सामने पूर्ण झाल्यानंतर आयपीएल 2021 चे उर्वरित सामने स्थगित करण्यात आले होते.
IPL 2021 Phase-2: आयपीएल (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचा रणसंग्राम 19 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यातील सामन्यासह स्पर्धा पुन्हा सुरू होईल. हा सामना दुबईमध्ये (Dubai) खेळला जाईल. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, 10 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर 1 तर एलिमिनेटर 11 ऑक्टोबर आणि क्वालिफायर 2 सामना 13 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. 15 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळला जाणार आहे. एएनआयशी बोलताना, घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी तारखांची पुष्टी केली. 29 सामने पूर्ण झाल्यानंतर बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसच्या एंट्रीमुळे आयपीएल 2021 चे उर्वरित सामने स्थगित करण्यात आले होते. (IPL 2021: रिषभ पंतचे कर्णधारपद धोक्यात? दिल्ली कॅपिटल्स संघात कमबॅकवर श्रेयस अय्यरने सोडले मौन)
“होय, आम्ही 19 सप्टेंबरला झालेल्या एमआय-सीएसके सामन्याने सुरुवात करीत आहोत. क्वालिफायर 1 आणि 2 अनुक्रमे 10 व 13 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल तर अलिमिनेटर 11 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. उर्वरित खेळाचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच संघाकडे देण्यात येईल,” असेही सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी अधिकृतपणे माहिती दिली होती की बोर्ड इंडियन प्रीमियर लीगचा पुन्हा एकदा युएई दौरा करणार आहे. शाह यांनी शेख नाह्यान बिन मुबारक अल नाह्यान, संयुक्त अरब अमिरातीचे सांस्कृतिक, युवा आणि सामाजिक विकास मंत्रालय आणि खालिद अल झारूनी यांची भेट घेतली होती. आयपीएलची 14 वी आवृत्ती युएईमध्ये पूर्ण केली जाईल.
दरम्यान, मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स संघात यापूर्वी 1 मे रोजी रोचक सामना रंगला होता. यामध्ये 219 धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबईने 34 चेंडूत किरोन पोलार्डच्या 87 धावांवर नाबाद खेळीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला होता. यंदाच्या आयपीएलच्या गुणतालिकेबद्दल बोलायचे तर 8 सामन्यांपैकी 6 विजयांसह दिल्ली कॅपिटल पॉईंटस टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. त्यांच्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, भारतीय कसोटी खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून ते थेट यूकेमधून युएईला रवाना होतील. भारत-इंग्लंड कसोटी मालिका 14 सप्टेंबर रोजी संपत आहे.